‘अध्यात्मात कृतीला ९८ टक्के महत्त्व असून तात्त्विक भागाला केवळ २ टक्केच महत्त्व आहे. ‘सनातन संस्था’ ही एकमेव अशी संस्था आहे, जी ‘अध्यात्म, समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्म’ अशा सर्व विषयांवर केवळ तात्त्विक स्तरावर न सांगता ‘यांतील सूत्रे कृतीत कशी आणायची ?’, याविषयी अचूक मार्गदर्शन करते. विविध माध्यमांतून आणि विविध प्रकारे संस्था साधकांसह जिज्ञासू अन् धर्मप्रेमी व्यक्तींना कृतीप्रवण करत आहे आणि कृतीमुळे मिळणारा आनंदही अनुभवायला शिकवत आहे. सनातन संस्थेने शिकवलेल्या ‘अष्टांग साधने’नुसार साधना केल्यास व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होऊ लागते. तात्त्विक विषयासमवेतच प्रायोगिक स्तरावर मार्गदर्शन करून सनातन संस्था साधक, तसेच संत यांच्या निर्मितीची प्रक्रिया अविरतपणे घडवत आहे.
समाजाला अध्यात्म शिकवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने विविध प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातात. ६ ते १० वर्षे वयोगट असलेल्या बालकांवर धर्मसंस्कार व्हावेत आणि त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात यांसाठी ‘बालसंस्कारवर्ग’, तर ११ ते १४ वर्षे वयोगट असलेल्या किशोरवयीन मुलांना धर्माचरण आणि राष्ट्रभक्ती शिकवण्यासाठी ‘सुसंस्कारवर्ग’ आयोजित केले जातात. १५ ते २२ वर्षे वयोगट असलेल्या युवकांमध्ये आत्मबल वाढवण्यासाठी ‘युवा साधना सत्संग’ आणि ‘व्यक्तीमत्त्व विकास कार्यशाळा’ आयोजित केल्या जातात. साधनेला प्रारंभ करू इच्छिणार्या सर्व वयोगटातील जिज्ञासूंना योग्य साधना शिकवणे आणि निरनिराळ्या योगमार्गांनुसार साधना करणार्यांना शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रायोगिक स्तरावरील मार्गदर्शन करणे, यांसाठी ‘साधना सत्संग’ आणि ‘साधना शिबिरे’ आयोजित केली जातात, तसेच प्राथमिक अवस्थेतील साधक आणि भक्तीयोगानुसार साधना करणारे यांना भक्ती साधना शिकवण्यासाठी ‘भक्तीसत्संग’ आयोजित केले जातात.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चैतन्यमय वाणीतील काही विशेष भक्तीसत्संग Sanatan.org वर उपलब्ध !
ईश्वराची आराधना करणार्या जिवांत देवता आणि गुरु यांच्याप्रती भक्तीभाव निर्माण व्हावा अन् त्यांना देवतांची कृपा संपादन करता यावी’, यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने प्रत्येक सप्ताहात भक्तीसत्संग घेतले जातात. सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चैतन्यमय वाणीतील या भक्तीसत्संगांमुळे साधना करण्याची प्रेरणा मिळून अंतरात भक्तीचे संस्कार खोलवर रुजू लागतात. हे सत्संग ऐकणार्यांना स्वतःतील भाव जागृत झाल्याची अनुभूती येते. मागील २ – ३ वर्षांपासून सण, उत्सव यांविषयी घेतलेले काही विशेष भक्तीसत्संग सनातनच्या संकेतस्थळावर जिज्ञासूंसाठी उपलब्ध आहेत. हे सत्संग श्रवण करून ईश्वरभक्ती वृद्धींगत होण्यासाठी जिज्ञासू याचा लाभ घेऊ शकतात.
सत्संग ऐकण्यासाठी लिंक – https://www.sanatan.org/mr/audio-gallery
या सत्संगांच्या माध्यमातून ‘अध्यात्म प्रत्यक्ष कसे जगायचे ? आणि प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण कसे करायचे ?’, याचे योग्य मार्गदर्शन मिळाल्याने ते कृतीत आणता येऊ लागते.
मागील ८ वर्षांपासून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ घेत असलेले भक्तीसत्संग, हे त्याचेच एक उदाहरण आहे. हे भक्तीसत्संग केवळ श्रवण करण्याचे सत्संग नसून ते साधकांना आध्यात्मिक, तसेच भक्तीची ऊर्जा प्रदान करून प्रत्यक्ष प्रयत्न करण्यासाठी कृतीप्रवण करतात. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चैतन्यमय आणि भक्तीने ओतप्रोत अशा वाणीने सर्वत्रच्या साधकांमध्ये भावभक्तीची वृद्धी होत आहे. साधकांनी कृतीच्या स्तरावर प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यामध्ये व्यक्तीगत, कौटुंबिक, तसेच व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा या स्तरांवर आमूलाग्र परिवर्तन होत आहे. लहान लहान कृतींना भावाच्या प्रयत्नांची जोड दिल्यामुळे साधकांचे अवघे जीवन भावमय होऊ लागले आहे आणि ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार त्यांना अनेक उच्च अनुभूती येत आहेत. यामुळे अनेक साधकांची साधनेत जलद गतीने प्रगती होत आहे.
जिज्ञासूंनो, सनातन सांगत असलेल्या काळानुसार साधनेचा लाभ करून घ्या आणि मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्या !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले