जत (जिल्हा सांगली), ८ डिसेंबर (वार्ता.) – तालुक्यात महा-इ-सेवा केंद्र आणि एकात्मिक नागरी सेतू सुविधा केंद्राकडून विविध प्रकारचे दाखले दिले जातात. विविध दाखल्यांसाठी निर्धारित केलेल्या शुल्काहून अतिरिक्त शुल्क नागरिकांकडून घेतल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी ८ डिसेंबर या दिवशी येथे दिली. (तहसीलदारांनी चेतावणी देण्याऐवजी अधिक शुल्क घेणार्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)
ते म्हणाले की, तालुक्यात महा-इ-सेवा केंद्र आणि नागरी सेतू केंद्रातून जातीचे, उत्पन्नाचे, नॉन क्रिमिलेअर, प्रतिज्ञापत्र यांसह अन्य सुविधा दिल्या जात आहेत; मात्र काही केंद्रांतून अधिक पैशांची मागणी केली जात आहे. विविध प्रकारचे दाखले आणि इतर कामे यांसाठी शासनाने निर्धारित केलेली रक्कम नागरिकांनी द्यावी. याहून अधिकची रक्कम देऊ नये. शासनाने ठरवून दिलेल्या शुल्काहून अधिक रकमेची मागणी संबंधित केंद्रचालकाने केल्यास याविषयीची माहिती तहसील कार्यालयात द्यावी. जेणेकरून वेळीच अशा चुकीच्या पद्धतीवर आळा घालता येईल. ग्रामस्थ, नागरिक आणि विद्यार्थी यांनी सजग राहून अतिरिक्त पैशांची मागणी केल्यास तात्काळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.
संपादकीय भूमिकामहा-इ-सेवा केंद्र आणि एकात्मिक नागरी सेतू सुविधा केंद्रातून अधिक पैशांची मागणी करणे हे प्रशासनास लज्जास्पद ! |