केरळमधील गुरुवायूर मंदिर व्यवस्थापनाने ‘उदयस्थान पूजा’ न करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रकरण
गुरुवायूर (केरळ) – वृश्चिकम् एकादशीच्या दिवशी म्हणजे ११ डिसेंबर या दिवशी जनतेची गैरसोय होईल, असे कारण देत ‘उदयस्थान पूजा’ न करण्याचा निर्णय गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिर प्रशासनाने घेतला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. याला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने मंदिर व्यवस्थापनाला अनुसरून नोटीस बजावली. ‘भाविकांची गैरसोय होईल’ या कारणावरून पूजा थांबवता येईल का ?, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. न्यायमूर्ती माहेश्वरी म्हणाल्या, ‘‘पूजा ही देवतेसाठी असते. देवतेचे चैतन्य वाढवण्यासाठी असते. त्यामुळे हे जनतेनुसार होऊ शकत नाही. हे कारण किती न्याय्य आहे, हे सूत्र आपण पडताळायला पाहिजे.
१. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या खंडपिठाने गुरुवायूर देवस्थान व्यवस्थापन समिती, तंत्री (मुख्य पुजारी) आणि केरळ सरकार या प्रतिवादींना ४ आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
२. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की, नियोजित दैनंदिन पूजाविधींमध्ये कोणताही पालट केला जाऊ नये.
३. याचिकाकर्त्यांची बाजू ज्येष्ठ अधिवक्ता सी. एस्. वैद्यनाथन् यांनी मांडली.
४. गर्दीच्या व्यवस्थापनातील अडचणी आणि दर्शनासाठी अधिक भाविकांना वेळ देण्याची इच्छा यांचा हवाला देत, मंदिर प्रशासनाने वृषिकम् एकादशीच्या दिवशी उदयस्थान पूजा टाळण्याच्या निर्णय घेतला होता.
५. मंदिराच्या वंशपरंपरागत पुजारी कुटुंबाचे सदस्य असलेल्या याचिकाकर्त्यांनी या निर्णयाला आव्हान दिले आणि असा युक्तीवाद केला की, मंदिर व्यवस्थापनाने प्राचीन प्रथा आणि विधी यांचे उल्लंघन केले आहे.
६. उदयस्थान पूजा शतकानुशतके केली जात आहे आणि ती आदि शंकराचार्यांनी चालू केली होती, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांनी न्यायालयासमोर केला. ती न केल्यास मंदिराचे पावित्र्य भंग होईल आणि भक्तांच्या श्रद्धेला तडा जाईल, यावर त्यांनी भर दिला.
संपादकीय भूमिकामंदिरांच्या सरकारीकरणामुळे मंदिर व्यवस्थापनाकडून असे निर्णय घेतले जातात. त्यामुळे मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत ! |