कुर्ला (मुंबई) येथे बेस्‍टच्‍या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्‍यू !

  • चौकशी समितीची स्‍थापना ! 

  • चालकाला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

कुर्ला बेस्‍टच्‍या बस क्रमांक ‘ए-३३२’चा अपघात

मुंबई – कुर्ला (पश्‍चिम) येथील महानगरपालिकेच्‍या एल् विभागाच्‍या कार्यालयाजवळ ९ डिसेंबरला रात्री ९.३० वाजता बेस्‍टच्‍या बस क्रमांक ‘ए-३३२’चा अपघात झाला. या अपघातामध्‍ये ७ जणांचा मृत्‍यू झाला असून ४९ जण घायाळ झाले आहेत. अपघातामधील मृतांची संख्‍या वाढण्‍याची शक्‍यता आहे. अपघाताच्‍या अन्‍वेषणासाठी बेस्‍टच्‍या मुख्‍य व्‍यवस्‍थापकांच्‍या (वाहतूक) अध्‍यक्षतेखाली समिती स्‍थापन करण्‍यात आली आहे. अपघातातील मृतांच्‍या नातेवाइकांना तातडीचे साहाय्‍य म्‍हणून बेस्‍टकडून २ लाख रुपये इतके, तसेच घायाळ व्‍यक्‍तींच्‍या उपचारासाठी अर्थसाहाय्‍य करण्‍याची घोषणा करण्‍यात आली आहे.

अपघात झालेली बस कुर्ला (पश्‍चिम) येथून अंधेरी येथे जात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्‍याने हा अपघात झाल्‍याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. भरधाव बेस्‍टच्‍या बसने रस्‍त्‍यावरील काही वाहने आणि पादचारी यांना धडक दिली. त्‍यानंतर एका भिंतीवर बस आदळली. या वेळी बसचालक संजय मोरे यांना जमावाने मारहाण केली. पोलिसांनी बसचालक संजय मोरे यांना कह्यात घेतले असून त्‍यांच्‍यावर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. त्‍यांना २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्‍यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी कुर्ला पश्‍चिम परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा ठेवण्‍यात आला होता, तसेच कुर्ला पश्‍चिम येथील बेस्‍टचे आगारही रात्रीपासून बंद ठेवण्‍यात आले आहे. घायाळ व्‍यक्‍तींना  रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे. ‘संजय मोरे मद्यपान करत नाही. झालेला अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला आहे’, असे सांगण्‍यात येत आहे.

‘मुख्‍यमंत्री साहाय्‍यता निधी’तून ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्‍य !

या अपघातातील मृतांच्‍या वारसांना मुख्‍यमंत्री साहाय्‍यता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्‍य करण्‍याची घोषणा मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याविषयी देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, ‘‘मृत व्‍यक्‍तींच्‍या कुटुंबियांच्‍या दुःखात आम्‍ही सहभागी आहोत. घायाळ व्‍यक्‍तींच्‍या प्रकृतीत लवकर सुधारणा व्‍हावी, यासाठी मी प्रार्थना करतो. घायाळ व्‍यक्‍तींवरील उपचार मुंबई महानगरपालिका आणि बेस्‍ट यांनी करण्‍याविषयीचा आदेश देण्‍यात आला आहे.’’