चिन्मय कृष्णदास प्रभु यांच्या अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने पेण येथे आंदोलन !
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/12/09214814/pen_C.jpg)
पेण, ९ डिसेंबर (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदूंची स्थिती सर्वांना लक्षात आली असेल. २ वर्षांपूर्वी इस्कॉन मंदिरामध्ये जाळपोळ झाली होती. त्याच मंदिरात जाळपोळ करण्यात आली. आमचे गुरु शील प्रभुपादजी यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. तेथील हिंदूंना जागृत करण्याचे कार्य करणार्या चिन्मय कृष्णदास प्रभु यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना अधिवक्ता न मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आपल्या रक्षणासाठी आपण वेळीच संघटित होऊया, अन्यथा भविष्यात एकत्र येणे अशक्य होईल, असे उद़्गार येथील इस्कॉनच्या साधिका सौ. मीनाक्षी पाटील यांनी केले. बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्णदास प्रभु यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदु अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून ८ डिसेंबर या दिवशी पेण येथील आंदोलनात करण्यात आली. त्या वेळी त्या बोलत होत्या. या आंदोलनात इस्कॉन, विश्व हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गोरक्षक मंगल पाटील गोशाळा, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी ‘जगात हिंदूंवर कुठेही आघात होत असतील, तर त्यांच्या पाठीशी रहाणे धर्मकर्तव्य आहे’, असे सांगितले.
अनेक देशांत बांगलादेशाविरुद्ध आवाज उठवला जात असतांना संयुक्त राष्ट्रे अजून निद्रिस्तच ! – अधिवक्ता गणेश म्हात्रे, इस्कॉन, पेण
भारताच्या फाळणीच्या वेळेप्रमाणेच हिंदूंवरील अत्याचारांची पुनरावृत्ती होत आहे. या आधीही बांगलादेशासमवेतच्या युद्धात हिंदूंच्या रक्षणासाठी सहस्रो सैनिक धारातीर्थी झाले होते; पण पुन्हा त्याच बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. अनेक देशांत बांगलादेशाविरुद्ध आवाज उठवला जात असतांनाही संयुक्त राष्ट्रे निद्रिस्तच आहे.
बांगलादेशी घुसखोरांची माहिती स्थानिक प्रशासनाला कळवा ! – रोहिदास शेडगे, माजी सरपंच, दिघाटी गाव
भारतात आज लाखोंच्या संख्येने बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोर आलेले आहेत. हिंदूंनो, सजग होऊन आपल्या विभागात कुणी बांगलादेशी अथवा रोहिंग्या घुसखोर असल्याचे लक्षात आल्यास त्यांची माहिती स्थानिक प्रशासनाला कळवा.
बांगलादेशातील घुसखोरांना हाकलण्यासाठी हिंदूंचे संघटन हवे ! – मंगल पाटील, गोरक्षक, बळवली, पेण
रायगड जिल्ह्यातही बांगलादेशी घुसखोर आहेत. त्यांची संख्या वाढल्यावर ते हिंदूंवर आक्रमणे करतात. त्यांना हाकलण्यासाठी हिंदूंचे संघटन हवे !