पुणे येथे शाळेतील वादातून वर्गातच ९ वीतील विद्यार्थ्यावर प्राणघातक आक्रमण !

  • काचेच्या तुकड्याने गळा चिरला !

  • १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा नोंद !

पुणे – वार्षिक समारंभावरून झालेल्या वादातून इयत्ता ९ वीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्याची घटना उघड झाली आहे. मांजरी भागातील एका शाळेमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी १४ वर्षीय मुलाच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेतील घायाळ विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

शाळेमध्ये वार्षिक समारंभाचे आयोजन करण्यात येत होते. या समारंभाच्या आयोजनावरून दोघांमध्ये वाद झाला होता. १९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी २ वाजता पीडित मुलगा वर्गामध्ये बसला होता. त्या वेळी आरोपी पाठीमागून आला. काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला. या घटनेनंतर वर्गातील इतर मुले घाबरली. घायाळ विद्यार्थ्याला शिक्षक आणि कर्मचारी यांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले.

संपादकीय भूमिका

या घटनेवरून लहान मुलांवर साधनेचे आणि धर्मशिक्षणाचे संस्कार करण्याचे महत्त्व लक्षात येते !