|
धरणगाव (जिल्हा जळगाव) – तालुक्यातील झुरखेडा येथे येत्या २४ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार्या बागेश्वरधाम येथील पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी महाराज यांच्या श्री हनुमंत कथा आणि दिव्य दरबार कथेचा भूमीपूजन सोहळा नुकताच पार पडला. या वेळी श्री महामंडलेश्वर १००८ हंसानंदजी तीर्थ महाराज (कपिलेश्वर), श्री स्वामी अद्वैतानंदजी चंद्रकिरणजी सरस्वती (तीर्थक्षेत्र गादीपती महर्षि कण्व आश्रम, कानळदा), श्री महामंडलेश्वर प.पू. महंत स्वामी नारायण (गादीपती रामेश्वर), महंत श्री श्री १०८ दीपकदास महाराज (गादीपती अवाचित हनुमान मंदिर), गुरुवर्य घनश्यामजी महाराज (जळगाव) या संत-महंतांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.
या भूमीपूजन कार्यक्रमाच्या वेळी राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील आणि मान्यवर उपस्थित होते. तसेच सनातन संस्थेचे श्री. सुभाष पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री विनोद शिंदे, जितेंद्र चौधरी, घनःश्याम दहिवदकर, निखिल कदम उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सक्रीय सहभाग होता.