Lakhvi In ​​Pakistan : मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणातील सूत्रधार आतंकवादी लखवी पाकमध्ये मोकाट !

पाकिस्तानकडून जगाच्या डोळ्यांत धूळफेक !

आतंकवादी  लखवी

रावळपिंडी (पाकिस्तान) – मुंबईवरील २६/११ च्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार जकी उर रहमान येथे उघडपणे रहात असल्याचे एका व्हिडिओद्वारे दिसून आले आहे. यात तो व्यायाम करतांना दिसत आहे. त्याला प्रशिक्षक व्यायामाचे धडे देतांना दिसत आहे. लखवी याला पाकिस्तानी न्यायालयाने कारागृहात ठेवण्याचा आदेश दिलेला असतांनाही तो बाहेर आहे.

संयुक्त राष्ट्रांनी त्याला ‘जागतिक आतंकवादी’ म्हणून घोषित केले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो ज्या ठिकाणी आढळला, तेथेच भारतीय क्रिकेट संघ चँपियन चषक स्पर्धेसाठीचा सामना खेळण्यासाठी जाणार होता.

मुंबईवर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांना लखवी याने प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. पाकिस्तानने लखवीला अटक केली होती; परंतु एका न्यायालयाने त्याला जामीन दिला. ४ वर्षाआधी पाकिस्तानातील आणखी एका न्यायालयाने लखवी याला आतंकवादाला अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी १५ वर्षांची शिक्षा सुनावली होती; परंतु या व्हिडिओतून लक्षात येते की, ही शिक्षा केवळ जगाला दाखवण्यासाठी म्हणून देण्यात आली असून प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानला आता ‘आतंकवादी देश’ घोषित करण्यासाठी भारताने जगावर दबाव आणणे आवश्यक आहे !