मिरज (जिल्हा सांगली) येथे उत्साही वातावरणात ‘वारकरी संत संमेलन’ पार पडले !
मिरज, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – शेकडो वर्षांच्या संघर्षांनंतर अयोध्या येथे श्रीराममंदिर साकारले आहे. आता रामराज्य येण्यासाठी हिंदूंनी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन प.पू. ईश्वरबुवा रामदासी यांनी येथे केले. येथील आळतेकर सभागृहात १५ नोव्हेंबर या दिवशी ‘विद्यार्थी विकास प्रतिष्ठान’च्या वतीने ‘वारकरी संत संमेलना’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
या वेळी ह.भ.प. डॉ. संजय दीक्षित म्हणाले, ‘‘श्रीकृष्णाने गीतोपदेश केल्यानंतर विराट रूपाचे दर्शन देऊन अर्जुनास युद्ध करण्यास भाग पाडले. यातून हिंदूंनी बोध घेऊन सिद्ध रहाणे आवश्यक आहे.’’ या संमेलनात पू. मौनी महाराज (भाळवणी), मिरज येथील वारकरी संप्रदायाचे उपाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पोतदार, ‘विद्यार्थी विकास प्रतिष्ठान’चे प्रा. मल्लिकार्जुन मठद, संजय परमणे, शरद देशपांडे, रोहन कडोले यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संमेलनात काशी विश्वेश्वर मंदिराचे श्री. माधवराव गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले. सामुदायिक पसायदान म्हणून संमेलनाची सांगता करण्यात आली.