|
पुणे – विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये १ ऑक्टोबरपासून १ सहस्र २६७ गुन्हे नोंद करण्यात आले असून १ सहस्र १७९ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९८२ वाहनांसह ५ कोटी ५५ लाख ६२ सहस्र रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे. (एवढ्या मोठ्या प्रमाणात कह्यात घेतलेला मुद्देमाल असेल, तर न पकडण्यात आलेला किती असेल ? – संपादक)
सराईत गुन्हेगारांच्या विरोधात दारूबंदी कायद्यान्वये ५९ प्रस्ताव संबंधित दंडाधिकार्यांकडे प्रविष्ट करण्यात आले आहेत. यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे शपथपत्र घेण्यात आले असून १२ प्रकरणांमध्ये ११ कोटी ८० सहस्र रुपये एवढ्या रक्कमेची बंधपत्रे घेण्यात आली आहेत.
जिल्ह्यामध्ये १८ ते २० नोव्हेंबर ‘कोरडा दिवस’ (‘ड्राय डे’)
जिल्ह्यात १८ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६ पासून ते २० नोव्हेंबर या दिवशी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि २३ नोव्हेंबर या मतमोजणीच्या दिवशी अधिकृत निकाल घोषित होईपर्यंत कोरडा दिवस (‘ड्राय डे’) (दारू विक्री करण्यास मनाई) घोषित करण्यात आला आहे.