मुंबई, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – महाविकास आघाडीवाले जातीच्या नावावर लोकांना लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करतात, मतांसाठी भगव्या आतंकवादाविषयी बोलतात. काश्मीरमध्ये कलम ३७० साठी प्रस्ताव समोर ठेवतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना तेथे लागू करण्यास विरोध करतात. महाविकास आघाडीच्या लोकांनी अनेक वर्षे मराठी भाषेला अभिजात (समृद्ध) भाषेचा दर्जा दिला नाही. त्यामुळे तुम्हाला महाविकास आघाडीच्या राजकारणापासून सावध रहायचे आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. १४ नोव्हेंबर या दिवशी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेवटची सभा दादरमधील शिवाजी पार्क येथे पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. या सभेला महायुतीच्या घटक पक्षातील सर्व नेते उपस्थित होते; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते.