पुणे – सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या कल्याण मोरदरीजवळील घेरा सिंहगड ग्रामपंचायत हद्दीतील सुभेदार बहिर्जी नाईक रामोशी वस्तीसाठी रस्ता नसल्याने रहिवाशांनी विधानसभेसाठी मतदान न करण्याचा निर्धार केला होता; मात्र हे समजताच जिल्हा प्रशासनाने रस्त्याची पहाणी करण्याचे आदेश तालुका तहसीलदारांना दिले आहेत. रस्त्याअभावी वस्तीतील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. बारमाही रस्ता नसल्याने शेताच्या बांधावरून, तसेच काटेरी झुडपांतून, ओढे, नाले ओलांडून रहिवाशांना प्रतिदिन ये-जा करावी लागते. पावसाळ्यात ओढ्याला पूर येत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. गंभीर आजारी रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचे मृत्यू होत आहेत; मात्र आता तहसीलदार पहाणी करणार असल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. (स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे होऊनही रस्ता नसणे, हे प्रशासनाचे अपयशच आहे. जनतेने मतदानावर बहिष्कार घालण्याचे पाऊल उचलल्यावर त्यांचे काम झाले, यातून प्रशासनाचे नाक दाबल्यावर तोंड उघडते, हे लक्षात येते. जनतेच्या समस्या न सोडवणारे प्रशासनच विसर्जित करा ! – संपादक)
संपादकीय भूमिका :मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्यावर कामे करणार्या कर्तव्यचुकारांवर कठोर कारवाई कधी होणार ? |