कृतीला भाव जोडणार्‍या आणि सतत भावाच्या स्थितीत रहाण्याची तळमळ असणार्‍या मोशी (पुणे) येथील सौ. सई संदीप कुलकर्णी (वय ३६ वर्षे) !

मला काही दिवसांपूर्वी मोशी (जिल्हा पुणे) येथे रहाणार्‍या सौ. सई कुलकर्णी यांच्या घरी रहाण्याचा योग आला. त्यांच्या समवेत २ दिवस राहिल्यानंतर ‘गुरुदेवांनी माझे नियोजन त्यांच्याकडे रहाण्याचे का केले होते ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेल्या सूत्रांतून लक्षात आले. सौ. सई यांचे देवाशी सहजतेने बोलणे, मनमोकळेपणा, सतत भावस्थितीत रहाण्याची तळमळ हे आणि असे अनेक गुण मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. त्यांचे हे गुण गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञतेच्या भावाने अर्पण करते. १२.११.२०२४ (कार्तिक शुक्ल एकादशी) या दिवशी सौ. सई कुलकर्णी यांचा ३६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

सौ. सई संदीप कुलकर्णी

सौ. सई संदीप कुलकर्णी यांना ३६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. मनमोकळेपणा

वैद्या सुश्री (कु.) माया पाटील

मी सौ. सईताईंच्या घरी प्रथमच गेले होते. त्यांच्यातील मनमोकळेपणाने बोलण्यामुळे ‘मी त्यांच्याकडे प्रथमच गेले आहे’, असे मला जाणवले नाही. त्यांच्यासोबत रहातांना मला कोणताच संकोच वाटला नाही.

२. चूक प्रांजळपणे स्वीकारणे

मी त्यांना एक सूत्र विचारले होते. प्रथम त्यांनी प्रतिमेपोटी योग्य उत्तर दिले नाही. थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आले की, आपण योग्य उत्तर दिलेले नाही. त्यांनी लगेचच ‘योग्य उत्तर न देण्यामागे कोणती विचारप्रक्रिया होती’, हे प्रांजळपणे सांगून क्षमायाचना केली.

३. प्रेमभाव

सईताईंमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. मी आश्रमात रहात असल्यामुळे त्यांनी महाप्रसाद किंवा प्रसाद यांसाठी पदार्थ बनवतांना जे पदार्थ आश्रमामध्ये नियमितपणे खाल्ले जातात, ते न बनवता वेगळे पदार्थ बनवले. यातून ‘इतरांचा विचार कसा करायला हवा’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. त्यांचे बोलणे पुष्कळ प्रेमळ आहे. सर्व कृतीही त्या प्रेमाने करत होत्या.

४. मुलांना श्रीकृष्ण सोबत असल्याची जाणीव करून देणे :

सौ. सई कुलकर्णी यांना एक मुलगी (कु. साची, वय १३ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि एक मुलगा (कु. कान्हा, वय ४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५५ टक्के) अशी २ मुले आहेत. ‘मुलांवर साधनेचे संस्कार व्हायला हवेत’, यासाठी त्या चांगले प्रयत्न करतात. मुलांकडून काही चुकीचे वागणे होत असेल, तर त्या लगेचच त्यांना ‘श्रीकृष्ण पहात आहे’, याची आठवण करून देतात. यातून मुलांवरही ‘श्रीकृष्ण सतत पहात असतो, तर आपण नीट वागायला हवे’, याचा संस्कार आपोआपच होत होता.

५. व्यष्टी साधनेविषयी गांभीर्य असणे 

सईताईंमध्ये ‘व्यष्टी साधना चांगली व्हायला हवी, याविषयीचे गांभीर्य पुष्कळ अधिक आहे’, असे जाणवले. ‘आश्रमामध्ये व्यष्टी साधनेचा आढावा कसा असतो ? तुम्ही कसे प्रयत्न करता ?’, याविषयी त्यांनी पुष्कळ तळमळीने आणि जिज्ञासू वृत्तीने जाणून घेतले. स्वतःच्या मनाची प्रक्रियाही मोकळेपणाने सांगून ‘त्यामध्ये कसे असायला हवे’, हेही विचारून घेतले.

६. ‘घर हा गुरूंचा आश्रम आहे’, असा भाव असणे

घरामध्ये वावरतांना ‘हा गुरूंचा आश्रम आहे’, असाच त्यांचा भाव असतो. आम्ही त्यांच्या घरी गेल्यानंतर ‘काहीही लागले, तरी संकोच करू नका, हा गुरूंचा आश्रम आहे’, असे त्यांनी आम्हाला सांगितले. ‘त्याही घरामध्ये तसेच वावरतात’, असे मला जाणवले.

भावस्थितीत रहाण्यासाठी कसे प्रयत्न करायचे हे मला सईताईंकडून शिकायला मिळाले. याविषयी त्यांच्याप्रती आणि गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! सईताईंप्रमाणे माझेही भाववृद्धीचे प्रयत्न लवकरात लवकर वाढू देत, अशी गुरुदेवांच्या चरणी कळकळीची प्रार्थना !’

– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील (वय ५३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.३.२०२४)