मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून १० नोव्हेंबर या दिवशी घोषणापत्र प्रसारित करण्यात आले. सत्तेत आल्यावर १०० दिवसांमध्ये काय करणार ?, याची सूची यात देण्यात आली आहे. सत्तेत आल्यास महिलांच्या रक्षणासाठी ‘शक्ती’ कायदा लागू करण्याचे आश्वासनही या घोषणापत्रात देण्यात आले आहे.
‘महालक्ष्मी योजने’च्या अंतर्गत महिलांना प्रतिमहिना ३ सहस्र रुपये देणे, विनामूल्य बसप्रवास, वर्षांतून ५ गॅस सिलिंडर प्रत्येकी ५०० रुपयांमध्ये देणार, महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणार, मासिक पाळीच्या काळात २ दिवस ऐच्छिक रजा, मुलगी जन्माला आल्यानंतर ती १८ वर्षांची झाल्यावर तिच्या खात्यामध्ये १ लाख रुपये जमा करणार, शेतकर्यांना ३ लाख रुपयांमध्ये कर्जमाफी आणि उर्वरित कर्ज फेडण्यात ५० सहस्र रुपयांची सवलत, पदवीधर युवक-युवतींना प्रतीमहा ४ सहस्र रुपये भत्ता देणे, युवकांच्या कल्याणासाठी ‘युवा आयोगा’ची स्थापना करणे, सरकारी रुग्णालयांमध्ये विनामूल्य औषधे उपलब्ध करून देणार, राज्यात जातीनिहाय जनगणना करणार, वृद्ध कलाकारांना मानधन चालू करणार आदी आश्वासने घोषणापत्रात देण्यात आली आहेत.
यासह वर्ष २०३० पर्यंत पूर्ण करण्याच्या योजनाही या घोषणापत्रात देण्यात आल्या आहेत. यामध्ये कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवणे, राज्यातील साडेबारा लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, राज्याचे नवीन शैक्षणिक धोरण घोषित करणे आदी आश्वासनेही या घोषणापत्रात देण्यात आली आहेत.