सोहळ्याला भावपूर्ण वातावरणात प्रारंभ !
इंदूर (मध्यप्रदेश) – ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदौर’च्या वतीने आयोजित प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज जन्मशताब्दी महोत्सवाच्या समारोप सोहळ्याला ९ नोव्हेंबर २०२४ या दिवशी नवनीत गार्डन, विज्ञान नगर, भक्तवात्सल्याश्रमाच्या समोर, इंदूर येथे भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. कार्यक्रमाचा प्रारंभ पंडित आयाचित आणि डॉ. विठ्ठल माधव पागे यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. शरद बापट, अन्य पदाधिकारी, तसेच डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्यासह अनेक भक्त उपस्थित होते. सनातन संस्थेचे प्रेरणास्थान असणारे प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव २६ ऑक्टोबर २०२३ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत साजरा करण्यात आला.
प.पू. रामानंद महाराज यांच्या नावाने चांदीच्या नाण्याचे प्रकाशनप.पू. रामानंद महाराज जन्मशताब्दीनिमित्त या सोहळ्याची आठवण म्हणून प.पू. रामानंद महाराज यांचे चांदीचे नाणे छापण्यात आले. या चांदीच्या नाण्याचे, तसेच ‘भक्तराज दिनदर्शिका २०२४’, प.पू. रामानंद महाराज यांच्या आवाजातील भजनांचा ‘पेन ड्राईव्ह’ आणि ‘सुखाची आठवण’ या सचित्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. |
समारोप सोहळ्याच्या निमित्ताने ९ नोव्हेंबरला सकाळी ९ ते १० या वेळेत प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज यांच्या चरणपादुका भक्तवात्सल्याश्रमातून कार्यक्रमस्थळी आणण्यात आल्या. त्यानंतर दीपप्रज्वलन तथा गुरुवंदना झाली. सकाळी १०.३० वाजल्यापासून देश-विदेशातून आलेल्या सनातन संस्थेचे श्रद्धास्थान असणारे प.पू. भक्तराज महाराज (प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज यांचे गुरु) यांच्या भजनमंडळीच्या वतीने चक्री भजनसेवा गुरुचरणी अर्पण करण्यात आली. त्यानंतर आरती, प्रसाद आणि महाप्रसाद झाला. दुपारच्या सत्रात नाशिक येथील श्रीमती स्नेहलता मधुकर कुलकर्णी आणि कुटुंबीय यांच्या वतीने ‘हम कथा सुनाते’ हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. त्यानंतर उज्जैन येथील विद्यावाचस्पती श्री. विठ्ठल माधव पागे यांचे ‘रामानंद माझा भक्तराज साई’ या विषयावर प्रवचन झाले. त्यानंतर श्री. दीपक विठ्ठल बिडवई आणि प.पू. भक्तराज महाराज भजन मंडळ, इंदूर यांच्या वतीने ‘भक्तवात्सल्य हा आश्रम सुंदर’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
१० नोव्हेंबरला सकाळी ९.३० वाजल्यापासून संत समागम, संतांचा सत्कार, निमंत्रित पाहुण्यांचा सत्कार, जन्मशताब्दी महोत्सव क्षणचित्रांच्या लघुग्रंथाचे प्रकाशन, ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या महामंत्राचा सर्वाधिक नामजप लिहिणार्या १३ भक्तांचे अभिनंदन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता श्री. भरत पडवळ (नाना) आणि भक्तराज महाराज भजन मंडळ, नाशिक यांच्या वतीने भजनसेवा अर्पण करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता महाप्रसाद भंडारा होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.