|
छत्रपती संभाजीनगर – जिल्हा प्रशासनाने शिक्षण विभागाला विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांची माहिती लपवणार्या ९२ शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. सिल्लोड तालुक्यातील ६० शाळांपैकी ३० शाळा मंत्री आणि शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्याशी संबंधित ‘नॅशनल एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रगती शिक्षण संस्थे’च्या आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाभरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि शाळा यांची माहिती जिल्हा प्रशासनाने मागितली होती; मात्र वारंवार नोटीस देऊनही जिल्ह्यातील एकूण ९२ शाळांनी माहिती भरली नसल्याचे लक्षात आल्यावर जिल्हा प्रशासनाने माहिती न देणार्या शाळांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागात अनेक नेत्यांची शाळा, महाविद्यालये आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात शिक्षक आणि अन्य कर्मचारी असून त्यांना सर्वेक्षण, प्रचार आदी निवडणूक कामांसाठी राजकीय नेते वापरतात. निवडणूक विभागाला त्यांची माहिती दिली, तर त्यांना निवडणुकीचे काम करावे लागेल. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या प्रचाराला हक्काचे मनुष्यबळ मिळणार नाही; म्हणून शाळांनी संस्थाचालकांच्या सांगण्यावरून माहिती भरली नाही. (अशी माहिती लपवली; म्हणून संबंधित राजकीय नेत्यांवरही कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)