हिंदु आणि मुसलमान यांच्यातील भूमीचा वाद ईश्वरी चमत्काराने सोडवणारे संत लीलाराम महाराज !

उद्या (१० नोव्हेंबर या दिवशी) संत लीलाराम महाराज, म्हणजेच स्वामी लीलाशाहजी महाराज यांचा महानिर्वाण दिवस आहे. त्या निमित्ताने…

संत लीलाराम महाराज

कार्तिक शुक्ल नवमी, म्हणजेच १० नोव्हेंबर या दिवशी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे गुरु स्वामी लीलाशाहजी महाराज यांचा महानिर्वाण दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्याविषयीचा एक प्रसंग येथे देत आहे.

भारत-पाकिस्तान फाळणीच्या पूर्वी सिंध प्रांतात एका जागेवरून हिंदु आणि मुसलमान यांच्यात जवळजवळ ३० वर्षांपासून वाद चालू होता. दोन्ही समुदाय त्या भूमीवर स्वतःचा अधिकार सांगत होते. इंग्रजांच्या राजवटीतील न्यायालयात हिंदु-मुसलमान विवाद लवकर निकाली लागत नव्हते किंवा मुद्दाम निकाली लावले जात नव्हते, असेही म्हणता येईल. शेवटी दोन्ही समुदायांनी आपापसांत असे ठरवले, ‘ही भूमी धार्मिक असल्याने यावर आपण पीर-फकीर आणि साधूसंत यांच्या साहाय्याने निर्णय घेऊया. ज्यांचे धर्मगुरु या जागेवर अधिक प्रभावी असा चमत्कार दाखवतील, त्यांचीच मालकी या जागेवर होईल आणि त्यानुसारच मशीद, दर्गा (मुसलमानाचे थडगे असलेले ठिकाण) किंवा मठ-मंदिराचे निर्माण कार्य होईल.’

श्री. मानव बुद्धदेव

मुसलमानांकडून आलेल्या पीर-फकिरांनी स्वतःचे मंत्र-तंत्र दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर आता पाळी होती हिंदूंनी शरण जाऊन ज्यांना मोठ्या सन्मानाने त्या ठिकाणी आणले होते अशा संतश्री लीलाराम महाराजांची ! स्वतः ब्रह्मानंदात मस्त होऊन महाराज अगदी साधारण माणसासारखे दोन्ही गुडघे वर करून त्यावर डोके ठेवून बसले होते. त्यांना बघून मुसलमानांना हसू येत होते. ते आपसात चर्चा  करत होते, ‘हा साधारण मनुष्य काय चमत्कार दाखवणार ?’ त्या जागेची सीमा निर्धारित करणारे एक कडुनिंबाचे झाड होते. हिंदूंनी महाराजांना लीला दाखवण्याची विनवणी करताच त्यांनी डोके वर करून त्या कडुनिंबाच्या झाडाला आदेश दिला, ‘अरे कडुनिंबा, तू येथे काय करत आहे ? जा, तेथे जाऊन उभा रहा.’ त्यांच्या मुखातून निघालेल्या चैतन्यवाणीचा असा प्रभाव पडला की, लगेच ते झाड सरकत सरकत दूर जाऊन स्थिर झाले. पुढे ते झाड सरकत जाऊन पुढे स्थिर झालेल्या कडुनिंबाच्या झाडपर्यंतची  सर्व  भूमी हिंदूंना मिळाली. पूर्वी कधीही न बघितलेला असा हा मोठा चमत्कार पाहून सर्वांनी  महाराजांचा जयजयकार केला. मुसलमान म्हणाले की, ‘तुमचे हे लीलारामजी आजपासून आमचे लीलाशाहजी आहेत’ आणि तेव्हापासून पुढे ‘संत लीलारामजी महाराज’ हे ‘स्वामी लीलाशाहजी महाराज’ म्हणून प्रसिद्ध झाले.

– श्री. मानव बुद्धदेव, अमरावती. (५.११.२०२४)