प्रमोद महाजन यांच्या हत्येचे नव्याने अन्वेषण आवश्यक ! – पूनम महाजन, माजी खासदार, भाजप

प्रमोद महाजन आणि पूनम महाजन

मुंबई – माझे वडील प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे काहीतरी गुप्त हेतू असावा. ही हत्या का झाली ? याचे नव्याने अन्वेषण करण्याची आवश्यकता आहे, असे मत भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.

‘वडिलांची हत्या झाली, तेव्हा त्यांच्या हत्येचा संशय सार्वजनिकरित्या बोलून दाखवण्यात मी असमर्थ ठरले होते. आता केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत आहे. त्यामुळे ‘या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी व्हावी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची मुळापासून चौकशी करावी आणि सत्य बाहेर आणावे, अशी मागणी मी करणार आहे’, असे पूनम महाजन म्हणाल्या.

२ एप्रिल २००६ या दिवशी वरळी येथील निवासस्थानी प्रमोद महाजन यांचा भाऊ प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून प्रमोद महाजन यांची हत्या केली होती. या प्रकरणी प्रवीण महाजन यांना ऑक्टोबर २००७ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. वर्ष २०२२ मध्ये पूनम महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे केवळ कौटुंबिक वाद नाही. यामागे एक सूत्रधार असल्याचे म्हटले होते.