परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली. पू. (श्रीमती) निर्मला दाते या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्यांच्यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, तसेच अन्य साधकांना उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय करवून घेतले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन येथे पाहूया.
काही प्रश्नोत्तरे
श्री. भानु पुराणिक : ७१ हा जप उपायांसाठी आला, तर आकड्यांच्या जपामध्ये शून्यापासून जेवढे लांब जाईल, तेवढे सगुणत्व आणि शून्याकडे जेवढे जवळ जाईल, तेवढे निर्गुणत्व असे धरायचे का ?
प.पू. डॉक्टर : त्यांना जो त्रास आहे, त्यावर ते अवलंबून आहे.
श्री. भानु पुराणिक : जपाचा आकडा पहिल्यांदा ३० आला, नंतर ७, ९, १५ ,५०, ६० असे आकडे आले.
प.पू. डॉक्टर : शक्ती पालटत जाते, त्याप्रमाणे आपले आकडे पालटतात.
श्री. नरेंद्र दाते : सगुण-निर्गुण असे काही नसते ना, आकडा जेवढा लहान तेवढा तो सगुणाकडे जातो, असे काही नाही ना ?
श्री. भानु पुराणिक : आपण म्हणतो की, शून्य हा निर्गुणाचा वाचक होतो, तसे इथे संख्येला काही महत्त्व नाही ना ?
प.पू. डॉक्टर : संख्येला महत्त्व नाही. ‘१ लक्ष, १ कोटी, असे वाढवत गेलो’, असे काही नाही.
श्री. भानु पुराणिक : ज्ञ आणि ज्ञं याच्यातही सगुण-निर्गुण असते कि ते तत्त्व कार्य करते ?
प.पू. डॉक्टर : सगुण-निर्गुण फार स्थूल (Gross) झाले. यांच्यातील चैतन्य कुठचे आहे, हे पहायचे.
श्री. भानु पुराणिक : अनुस्वार असणारे अक्षर अधिक उच्च कि अनुस्वार नसणारे उच्च ?
प.पू. डॉक्टर : तसे काही नाही. स्थितीला काय आवश्यक आहे, ते महत्त्वाचे. अनुस्वार असणारे अक्षर अधिक उच्च.
श्री. भानु पुराणिक : आपण तापासाठी गोळी घेतो. ‘पॅरासिटामोल’ ही प्राथमिक टप्प्याची झाली. ताप अधिक आला, तर त्याच्यापेक्षा अधिक शक्तीची गोळी घेतो.
प.पू. डॉक्टर : अध्यात्मात तसे नाही.
श्री. भानु पुराणिक : म्हणजे त्या त्या प्रकृती किंवा त्याची आवश्यकता त्यानुसार जे तत्त्व आवश्यक आहे, तो जप ! त्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ, सगुण-निर्गुण, असे काही नाही.
प.पू. डॉक्टर : हो, असे काही नाही. आता सगळे कोट्यवधीचे अंक सगुणातील आहेत ना, निर्गुणात कुठे !
श्री. भानु पुराणिक : अक्षर हे सगुणातील आहे ना ? आणि अंक निर्गुणाकडे जातो. अक्षराला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असतो.
प.पू. डॉक्टर : बरोबर आहे.’
अन्य सूत्रे
१. प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘जेव्हा एका विशिष्ट ठिकाणी उपाय करायचे असतात, तेव्हा हाताची पाचही बोटे एकत्र करून न्यास करावा.’’
२. सौ. ज्योती दाते यांनी विचारले, ‘‘पू. दातेआजींचा काही दिवसांपूर्वी महामृत्यूयोग होता, तो टळला’, असे त्यांना स्वतःला कळत असेल का ?’’ त्यावर प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आध्यात्मिक भाषेतील काही समजत नाही, बरे वाटत आहे, ही जाणीव असते.’’
– सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.६.२०२४)