‘वर्ष २०२२ मध्ये सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मी आणि माझी मुलगी ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दिव्या जोशी (वय ६ वर्षे) त्यांना शुभेच्छा पत्र द्यायला गेलो होतो. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘बरे आहे ना, इथे आश्रमात दिव्याला खेळायला मोकळी जागा आहे आणि सुरक्षित वातावरण आहे. त्यामुळे काळजी नाही.’’ त्यांनी दिव्याला विचारले, ‘‘तू प्रतिदिन नामजप करतेस का ?’’ तेव्हा मला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटली आणि माझे मन भरून आले. इतर वेळीही जातांना-येतांना भेट झाल्यावर ते आवर्जून तिची विचारपूस करतात. आश्रमातील सद्गुरु आणि संत यांना साधकांची किती काळजी असते ! ते केवळ प्रकृतीची विचारपूस करून थांबत नाहीत, तर आध्यात्मिक स्तरावरही मार्गदर्शन करतात.
दुसर्या दिवशी मला त्यांच्याशी झालेला संवाद आठवला. त्यांचे वरील वाक्य आठवून माझी भावजागृती झाली अन् मला काव्य स्फुरले. श्रीकृष्णानेच ते सुचवले आणि लिहून घेतले. सद्गुरु दादांच्या सत्संगामुळे माझा कृतज्ञताभाव जागृत झाला आणि कविता स्फुरू लागली; म्हणून त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
देवा, कृतज्ञतेला शब्दच नाहीत माझ्याकडे ।
देवा या अज्ञानी जिवाला साधना करण्यासाठी मनुष्य जन्म दिलास ।
पवित्र आध्यात्मिक विश्वगुरु अशा भारतमातेच्या पोटी जन्म दिलास ।। १ ।।
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मला वाढवलेस ।
आभाळभर मायेने भरलेले माहेर आणि सासर दिलेस ।। २ ।।
साधक पती आणि दैवी बालिका पदरी दिलीस ।
तरी देवा कृतज्ञतेला शब्दच नाहीत माझ्याकडे ।। ३ ।।
तळहाताच्या फोडाप्रमाणे मला जपणारी गुरुमाऊली (टीप १) दिलीस ।
साधना आणि सेवा करण्यासाठी आश्रमरूपी चैतन्याचे मंदिर दिलेस ।। ४ ।।
संत आणि सद्गुरु यांचे अमूल्य मार्गदर्शन दिलेस ।
सहसाधकांच्या रूपात आध्यात्मिक सखी-सवंगडी दिलेस ।। ५ ।।
मनाच्या प्रक्रियेसाठी फलक आणि समष्टी दिलीस ।
तरी देवा कृतज्ञतेला शब्दच नाहीत माझ्याकडे ।। ६ ।।
केवळ सणासुदीला मिळणारा प्रसाद आश्रमात चारही प्रहरी दिलास ।
थंड आणि गरम पाणी सहज उपलब्ध करून दिलेस ।। ७ ।।
जणू तीर्थक्षेत्रातील शीतोष्ण जलाशयच दिलेस ।
तरी देवा कृतज्ञतेला शब्दच नाहीत माझ्याकडे ।। ८ ।।
साधनेत मार्गदर्शनासाठी अतुलनीय अशी ग्रंथसंपदा दिलीस ।
योग्य संपादकीय दृष्टीकोनासहित ‘सनातन प्रभात’रूपी गुरुदेवांचे संदेशपत्र दिलेस ।। ९ ।।
प्रत्येक सेवेतून शिकण्याची अन् घडण्याची संधी दिलीस ।
चुकांमधून शिकून पुढे पुढे जायला शिकवलेस ।। १० ।।
सजीव-निर्जीव वस्तूंकडूनही शिकण्याची नवीन दृष्टी दिलीस ।
मायेतून बाहेर काढून साधनेच्या योग्य मार्गावर आणलेस ।। ११ ।।
माया करणारे आणि साधनेत साहाय्य करणारे साधक दिलेस ।
कुटुंब नाही, तर पूर्ण सनातन परिवारच दिलास ।। १२ ।।
माझे पूर्ण आयुष्यच ‘सनातन’मय केलेस ।
तरी देवा, कृतज्ञतेला शब्दच नाहीत माझ्याकडे ।। १३ ।।
देवा, तू मला सर्व काही दिलेस ।
पण या पामराकडे तुला देण्यासाठी काहीच नाही रे ।। १४ ।।
माझे मन निर्मळ आणि शुद्ध व्हावे ।
तुझ्या चरणी त्याचे सुगंधी साधक फूल व्हावे ।। १५ ।।
माझे मीपण काहीच न उरावे ।
केवळ तुझ्या चरणांची धूळ बनून रहावे ।। १६ ।।
टीप १ : परात्पर गुरु डॉक्टर आठवले
– सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |