‘श्रीमती गीता प्रभु यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी भ्रमणभाषचा अनावश्यक वापर करण्याची सवय सुटण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. या लेखातून अन्य साधकांनाही ही सवय सुटण्यासाठी प्रयत्न करण्यास नक्कीच प्रेरणा मिळेल !’
– परात्पर गुरु डॉ. आठवले (१८.११.२०२३)
‘सध्या भ्रमणभाषचा अनावश्यक वापर करण्याच्या सवयीमुळे पिढ्यान्पिढ्या उद्ध्वस्त होत आहेत. ‘दिवसभर भ्रमणभाषवर कार्यक्रम पहात रहाणे’, या सवयीमुळे मनाला इतर काहीच करण्याची इच्छा होत नाही. या सवयीमुळे शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होतात. ‘आपण नकळतपणे या सवयींच्या आहारी जात आहोत’, याचे भान ठेवायला हवे. मलासुद्धा ही सवय जडली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मी केलेले प्रयत्न पुढे दिले आहेत.
१. मुंबईला गेल्यावर भ्रमणभाषवरील कार्यक्रम पहाणे आणि ‘आपण साधनेचा बहुमूल्य वेळ वाया घालवत आहोत’, याची जाणीव होणे
‘नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मला वैयक्तिक कारणासाठी रामनाथी आश्रमातून मुंबईला जावे लागले. तिथे मी सतत भ्रमणभाषवर ‘यू ट्यूब’वरचे कार्यक्रम पहात असे. नंतर रामनाथी आश्रमात आल्यानंतरही मी निवासस्थानी गेल्यावर भ्रमणभाष पहात असे. तेव्हा माझ्या मनात ‘आपण साधनेचा बहुमूल्य वेळ वाया घालवत आहोत’, ही अपराधीपणाची भावना असायची.
२. भ्रमणभाष पहाण्याची सवय घालवण्यासाठी केलेले प्रयत्न
२ अ. भ्रमणभाष दुसर्या साधिकेकडे ठेवायला देणे : एकदा मी माझी समस्या ‘सनातन प्रभात’चे संपादक श्री. योगेश जलतारे यांना सांगितली. त्यांनी मला खोलीत गेल्यावर माझा भ्रमणभाष दुसर्या साधिकेकडे ठेवायला देण्यास सांगितला; पण तसे केल्यावरही मी केवळ तीनच दिवस भ्रमणभाषपासून दूर राहू शकले.
२ आ. स्वयंसूचना देणे : नंतर मी या स्वभावदोषावर स्वयंसूचना देऊ लागले, तरीही मी ९ दिवस भ्रमणभाषपासून दूर राहिले. नंतर पुन्हा मला मोह झाला आणि मी भ्रमणभाषवरील कार्यक्रम पाहू लागले.
२ इ. एका संतांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर युवा साधकांचे मनोगत ऐकून प्रभावित होणे आणि भ्रमणभाषचा अनावश्यक वापर न करण्याचा निश्चय करणे : एकदा मी एका संतांनी युवा साधकांना केलेले मार्गदर्शन ऐकले. त्या वेळी युवा साधकांनी ‘त्यांच्या साधनेत येणार्या अडचणी आणि त्या दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न’, याविषयी व्यक्त केलेले मनोगत ऐकून मी प्रभावित झाले. त्या वेळी माझी मलाच लाज वाटली. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘ही इतकी लहान मुले किती तळमळीने साधनेचे प्रयत्न करत आहेत ! आणि मी मात्र ६७ वर्षांची असूनही भ्रमणभाषची सवय सोडू शकत नाही.’ त्या वेळी मी निश्चय केला, ‘आपण आता कधीही भ्रमणभाषचा अनावश्यक वापर करायचा नाही.’ याचा परिणाम म्हणून मी १९ दिवस भ्रमणभाषपासून दूर राहिले. तेव्हा मला वाटले, ‘माझे भ्रमणभाष पहाण्याचे व्यसन सुटले’; पण २० व्या दिवशी मी पुन्हा भ्रमणभाषवरील कार्यक्रम पाहू लागले.
२ ई. व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्या साधिकेला प्रामाणिकपणे स्थिती सांगून भ्रमणभाषचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रयत्न करणे : त्यानंतर एका साधकाने माझ्या या सवयीविषयी माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्या साधिकेला सांगितले. तिने मला याविषयी विचारल्यावर मी प्रामाणिकपणे माझी स्थिती सांगितली आणि ‘पुन्हा भ्रमणभाषवरील कार्यक्रम पहाणार नाही’, असे सांगितले. ज्या साधकाने आढावासेविकेला हे सूत्र सांगितले, त्या साधकाविषयी मला कृतज्ञता वाटली. मी आढावासेविकेला सांगितल्याप्रमाणे ३ दिवस भ्रमणभाष पाहिला नाही. पुन्हा मला भ्रमणभाष पहायचा मोह झाला; पण या वेळी मी केवळ निवासस्थानी असतांनाच भ्रमणभाष पाहू लागले; कारण मला मनापासून या व्यसनापासून मुक्त व्हायचे होते.
२ उ. ‘इंटरनेट’चा कालावधी संपल्यावर ते पुन्हा ‘रिचार्ज’ न करणे : मला भ्रमणभाष पहाण्याची सवय सोडायची होती; म्हणून मी ११.८.२०२२ या दिवशी ‘इंटरनेट’चा कालावधी संपल्यावर ते पुन्हा ‘रिचार्ज’ केले नाही. त्यानंतर मी २८.८.२०२२ या दिवशी श्री गणेशचतुर्थीसाठी मुलाकडे मुंबईला गेले. त्याच्या घरी ‘इंटरनेट’ असूनही मी ‘यू ट्यूब’वरील कार्यक्रम पाहिले नाहीत. आता मला ‘यू ट्यूब’वरील कार्यक्रम पहाण्याची इच्छाही होत नाही.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मी या वाईट सवयीतून बाहेर पडू शकले’, याबद्दल मी त्यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती गीता प्रभु (वय ६७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.८.२०२२)