‘माझ्या मुलीला (कु. मधुराला) आध्यात्मिक त्रास असल्यामुळे तिची प्राणशक्ती अल्प असते. त्यामुळे ती दिवसभर आश्रमातील खोलीतच असते. मी आणि तिचे वडील (आधुनिक वैद्य भिकाजी भोसले) तिच्या समवेत एकाच खोलीत रहातो. मला तिच्या सहवासात तिच्या साधनेविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे लेखबद्ध केली आहेत.
१. ‘दैवी शक्ती नामजप करून घेत आहे’, असे मधुराला जाणवणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मधुराचा नामजप सतत होत असणे
‘मधुरा अखंड तिच्या बोटातील जपमाळेने नामजप करते. ‘कोणती तरी दैवी शक्ती तिच्याकडून ‘ॐ’, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हे नामजप करून घेत आहे’, असे तिला आतून जाणवते. त्यामुळे तिचा नामजप पुटपुटत होत असतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तिचे हे वैशिष्ट्य आमच्या लक्षात आणून दिले. खरेतर त्यांच्याच कृपेने तिचा सतत नामजप चालू असतो.
२. खोलीतील लहानसहान सेवा भावपूर्ण करणे
तिची प्राणशक्ती अल्प असल्यामुळे तिला फारशा शारीरिक सेवा करता येत नाहीत. तिची थोडीतरी हालचाल व्हावी; म्हणून तिला दोन वेळा खोलीतील केर काढणे, कपडे घडी करून ठेवणे, तुळशीची लहानशी कुंडी सकाळी उन्हात खिडकीत ठेवणे आणि सायंकाळी ती कुंडी खिडकीतून खोलीत खाली ठेवणे, सायंकाळी देवापुढे दिवा आणि उदबत्ती लावणे, अशा सेवा नेमून दिल्या आहेत. ती त्या सेवा नियमित भावपूर्ण करते. ‘ती अध्यात्माचे केवळ तात्त्विक स्तरावरील ज्ञान न मिळवता अध्यात्मातील सूत्रे कृतीत आणून अध्यात्म जगण्याचा प्रयत्न करते’, असे आम्हाला जाणवते.
३. आई-वडिलांप्रती भाव
३ अ. आई-वडिलांची भावपूर्ण सेवा करणे : मी आणि तिचे वडील दुपारी विश्रांतीसाठी खोलीत जातो. त्या वेळी ती पलंगावरील लोड आणि उशा काढून ठेवते. ती तिच्या वडिलांसाठी पलंगावर वेगळी चादर घालते. तेव्हा तिचा ‘खोलीत विश्रांती घेण्यासाठी आई-बाबांच्या माध्यमातून दोन संत येणार आहेत’, असा भाव असतो. ती अधून मधून तिच्या वडिलांचे पाय चेपण्याचीही सेवा करते. त्यामुळे ‘पितृऋण फिटेल’ असे तिला वाटते.
३ आ. आईच्या वाढदिवसानिमित्त भावपूर्ण कविता करणे : माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ती पुष्कळ उत्साहात असते. या वर्षी तिने माझ्यासाठी शुभेच्छापत्र सिद्ध केले. तिने माझ्यावर भावपूर्ण कविता केली होती. ते शुभेच्छापत्र वाचून साधकांची भावजागृती झाली.
४. अंतर्मुखता
ती खोलीत घडणार्या प्रत्येक प्रसंगाचे चिंतन करते आणि ‘साधनेच्या दृष्टीने आणखी काय करायला हवे ? काय चुकले ?’, हे ती मला आणि तिच्या वडिलांना विचारते. आम्ही तिला तिची चूक सांगितल्यावर ती तिची चूक त्वरित स्वीकारून आमची क्षमायाचना करते. ती ‘तीच चूक पुन्हा होऊ नये’, याची काळजी घेते.
५. लहान मुलांशी जवळीक साधणे
काही वर्षांपासून कु. मुकुल प्रभु (वय १२ वर्षे) आमच्या कुटुंबातील एक सदस्य बनला आहे. त्याला बालपणापासून आमचा लळा आहे. तो मधुरामावशीला भेटल्याविना त्याचा वाढदिवस साजरा करत नाही. मधुरालाही त्याचा एवढा लळा लागला आहे की, आम्ही काहीही पदार्थ आणला की, मधुरा त्याच्यासाठी आधी बाजूला काढून ठेवते. आमच्या खोलीत कधीही लहान मुले येतात. त्या वेळी मधुरा त्यांचे लाड करून त्यांना खाऊ भरवते. ती लहान मुलांशी फार प्रेमाने वागते आणि बोलते. मुलांनाही ती आवडते.
६. साधकांप्रती प्रेमभाव
६ अ. साधकांना खाऊ देणे : साधक-साधिका तिला भेटण्यासाठी खोलीत आल्यास ती त्यांना खाऊ देते. आध्यात्मिक त्रास असणारे साधक-साधिका तिला भेटण्यासाठी आल्यास ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तिच्यासाठी पाठवलेला प्रसाद त्या साधकांना देते. ‘गुरुदेवांनी दिलेल्या प्रसादातून त्यांना चैतन्य मिळून त्यांचा आध्यात्मिक त्रास न्यून व्हावा’, अशी तिची इच्छा असते.
६ आ. साधकांना वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देणे : सहसाधिकेचा वाढदिवस असतांना मधुरा त्या साधिकेला भेटवस्तू देते. आश्रमाच्या जवळ श्री शांतादुर्गादेवी आणि रामनाथदेव यांची मंदिरे आहेत. त्या देवतांची वार्षिक जत्रा असते. तेव्हा आम्ही तेथे जातो. त्या वेळी मधुरा इतरांना भेट देण्यासाठी वस्तूंची खरेदी अधिक करते आणि स्वतःसाठी अल्प वस्तू खरेदी करते. तिला देवतांच्या जत्रेतील सात्त्विक वस्तू साधिकांना भेट द्यायला आवडतात.
७. साधकांना मधुराचा वाटत असलेला आधार
७ अ. साधकांनी मधुराला साधनेतील अडचणी विचारणे आणि मधुराने सांगितलेल्या सूत्रांचा त्यांना लाभ होणे : मधुरा पूर्वी प्रसारसेविका म्हणून सेवा करत होती. आता ती आश्रमात राहून ‘सूक्ष्म परीक्षण करणे आणि ईश्वरी ज्ञान मिळवणे’ या सेवा करते. तिने विविध व्यक्ती, संत किंवा घटना यांच्या केलेल्या सूक्ष्म परीक्षणाचे लेख दैनिक ‘सनातन प्रभात’ मधून प्रसिद्ध होतात. त्यामुळे तिला संस्था स्तरावरील आणि प्रसारातील अनेक साधक ओळखतात. रामनाथी आश्रमात शिबिरानिमित्त प्रसारातील अनेक साधक येतात. ते मधुराला भेटायला खोलीत आवर्जून येतात. ते तिला साधनेतील अडचणी सांगून त्यावर उपाय विचारतात. त्या वेळी ‘आमच्या खोलीत एक भावसत्संगच चालू आहे’, असे मला जाणवते.
काही वर्षांपूर्वी मधुरा कर्नाटक येथे प्रचारसेवा करत होती. तेथील साधिका आश्रमात आल्यावर तिला भेटायला खोलीत थोडा वेळ तरी येतातच, तसेच केरळ येथील सर्व साधक ज्या ज्या वेळी आश्रमात येतात. तेव्हा तिला भेटल्याविना परत जात नाहीत.
आम्ही साधनेचा आरंभ सातारा येथून केला असल्याने तेथील साधकांशी आमची जवळीक आहे. साधक तिला प्रत्यक्ष भेटून किंवा भ्रमणभाषद्वारे व्यष्टी साधनेविषयी अडचणी सांगून उपाय विचारतात. ‘तिने सुचवलेल्या सूत्रांचा त्यांना लाभ होतो’, असे ते सांगतात.
७ आ. साधकांचे शंकानिरसन करणे : नाशिक येथील श्री. अनिल पाटील (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७७ वर्षे) साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधील मधुराचे लेख वाचून तिला शंका विचारतात आणि मधुरा त्यांच्या शंकांचे निरसन करते.
७ इ. साधिकेने मधुराकडून श्री शांतादुर्गादेवीच्या मंदिरातील सात्त्विक साड्या मागवणे आणि अन्य एका साधिकेने मधुराकडून भावचित्रे काढून घरात लावणे : एका शहरातील एक साधिका त्यांच्या नातींसाठी मधुराला शांतादुर्गादेवीच्या मंदिरातील सात्त्विक साड्या पाठवण्यासाठी सांगतात. आम्ही साड्या खरेदी करून त्यांना पाठवतो. एका साधिकेने तिच्या घरात लावण्यासाठी कु. मधुराने काढलेली भावचित्रे नेली आहेत.
८. साधक आणि संत यांचा मधुराप्रती प्रेमभाव
८ अ. साधकांनी मधुराची विचारपूस करणे आणि ‘साधकांच्या रूपातील गुरुदेवच तिची विचारपूस करत आहेत’, असे वाटणे : रामनाथी आश्रमातील साधक माझ्याकडे प्रतिदिन मधुराची विचारपूस करतात. ते मला ‘मधुरा जेवली कि नाही ? तिची प्रकृती कशी आहे ?’, असे विचारतात. तेव्हा मला वाटते, ‘साधकांच्या रूपातील गुरुदेवच तिची विचारपूस करत आहेत.’
८ आ. मधुरा साधकांची आवडती असणे आणि तिने केलेले व्यक्ती किंवा घटना यांचे सूक्ष्म परीक्षण साधकांना आवडणे
१. मधुरा कधी खोलीतून बाहेर आलेली दिसली की, साधिका तिच्याशी बोलण्यासाठी घोळका करून उभ्या रहातात.
२. तिने केलेले कै. (श्रीमती) उषा मोहे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ८१ वर्षे) यांचे मृत्यूत्तर सूक्ष्म परीक्षण सर्व वयस्कर साधकांना पुष्कळ आवडले. काही वयस्कर साधिकांनी खोलीत येऊन तिच्या गालांवर हात फिरवून तिचे लाड केले. सर्व वयस्कर साधकांना ते सूक्ष्म परीक्षण भावले आणि त्यांनी ‘परात्पर गुरु आमचीही अशीच काळजी घेतील’, याची शाश्वती त्यांना वाटत असल्याचे सांगितले. ते सूक्ष्म परीक्षण विदेशातील साधकांनीही ‘ऑनलाईन’ भाषांतर करून वाचले आणि त्यांनीही ते आवडल्याचे कळवले.
३. आश्रमात एखादा यज्ञ किंवा सोहळा झाला की, त्याचे मधुराने केलेले सूक्ष्म परीक्षण वाचायला साधक उत्सुक असतात. अयोध्येत झालेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे मधुराने केलेले सूक्ष्म परीक्षण दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रसिद्ध झाले. साधकांनी ते उत्सुकतेने वाचले.
८ इ. साधकांनी मधुराला भेटवस्तू देणे : प्रसारातील काही साधक आश्रमात आल्यावर ते मधुरासाठी घरी केलेला पदार्थ तिला देतात. त्यांना मधुरामध्ये देवीचे दर्शन होते. कर्नाटकमधील साधिका नेहमी तिच्यासाठी साडी भेट म्हणून पाठवतात. काही साधिका तिला दिवाळीचा फराळ आवर्जून पाठवतात.
८ ई. संतांनी मधुराची विचारपूस करणे आणि तिला भेटायला खोलीत येणे : आश्रमातील संत जेव्हा मला भेटतात आणि प्रसारातील संत जेव्हा रामनाथी आश्रमात येतात, तेव्हा ते मधुराची आठवण काढतात. त्यांना वेळ मिळाला, तर ते तिला भेटायला आवर्जून खोलीत येतात. पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी (सनातनच्या ९० व्या संत) तिला घरी येण्यासाठी पुष्कळ आग्रह करतात.
९. मधुराचा संतांप्रती भाव
९ अ. ‘प्रसारातील संत आश्रमात आले आहेत’, असे मधुराला समजल्यास ती त्यांना कृतज्ञताभावाने काही भेटवस्तू पाठवून त्यांचे आशीर्वाद घेते.
९ आ. मधुराने एका संतांच्या वाढदिवसानिमित्त केलेले भावपूर्ण कृतज्ञतापत्र हातात धरल्यावर तिच्या आईच्या अंगावर रोमांच येणे आणि त्या संतांना सगुण-निर्गुण तत्त्व जाणवणे : एका संतांच्या वाढदिवसानिमित्त मधुराने भावपुष्पे काढलेले कृतज्ञतापत्र सिद्ध करून दिले. मी ते हातात धरल्यावर माझ्या अंगावर रोमांच आले. त्या संतांनी सांगितले, ‘‘भावचित्रातून सगुण-निर्गुण तत्त्व जाणवते आणि फुलांमधून भाव जाणवतो.’’
मधुराने सर्व साधकांचे प्रेम प्राप्त केले आहे आणि तिने ते टिकवून ठेवले आहे. हे सर्व ती प्रीतीचे साक्षात् रूप असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांकडून शिकली आहे आणि ती ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करते.’
– डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले (मधुराची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०२४)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |