पोर्शेकार अपघात प्रकरणी आधुनिक वैद्यांविरोधात खटला चालवण्यास राज्यशासनाची संमती !

पुणे – कल्याणीनगर येथील पोर्शेकार अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या मुलासह त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी ससून रुग्णालयाच्या न्याय वैद्यक विभागाने तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरि हाळनोर, तसेच शिपाई अतुल घटकांबळे यांच्या विरोधात फौजदारी खटला चालवण्यास राज्यशासनाने संमती दिली आहे. (आधुनिक वैद्यांच्या प्रतिमेला काळीम फासणारी ही घटना असून अशा आधुनिक वैद्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक) वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेले संमती पत्र विशेष न्यायाधीश यु.एम्. मुधोळकर यांच्या न्यायालयात विशेष सरकारी अधिवक्ता शिशिर हिरे यांनी दिले. ससून मधील आधुनिक वैद्यांसह ७ आरोपींच्या विरोधात आरोप निश्चिती करून सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. फौजदारी खटला चालवण्यासाठी पुणे पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९७ प्रमाणे राज्यशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. आरोप निश्चिती झाल्यावर सुनावणी चालू होईल, असे विशेष सरकारी अधिवक्ता शिशिर हिरे यांनी सांगितले.