‘दीपावलीला, म्हणजेच आश्विन अमावास्येच्या तिन्हीसांजेला लक्ष्मीपूजन केले जाते. हे लक्ष्मीपूजन संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्षलक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी असते. या लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी तिने तिची आठ रूपे प्रगट करून त्यांची आराधना करण्याची संधी आपल्याला दिली आहे. ती आठ रूपे, म्हणजेच ‘आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी !’ श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधना (टीप) करण्यास सांगितले आहे. ‘अष्टांग साधनेच्या माध्यमातून या अष्टलक्ष्मींची कृपा आपण कशी अनुभवू शकतो ?’, हे जाणून घेऊया.
टीप – अष्टांग साधना : स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, अहं-निर्मूलन, नामजप, भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग अन् प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)
‘३० ऑक्टोबर २०२४ या दिवशी अष्टलक्ष्मींच्या ‘आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी आणि गजलक्ष्मी’, या ४ रूपांविषयी पाहिले. आजच्या भागात आपण अष्टलक्ष्मींच्या उर्वरित संतानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी या ४ रूपांविषयी जाणून घेऊया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/849454.html
साधकांनो, यंदाच्या दीपावलीला अष्टांग साधना पूर्णत्वाला नेण्यासाठी साहाय्य करणार्या अष्टलक्ष्मींना प्रार्थना करून त्यांचे कृपाशीर्वाद संपादन करूया !
‘लावूया अंतरी साधनेची पणती ।
ईश्वरी गुणांच्या त्यात घालूनी वाती ।। १ ।।
अष्टलक्ष्मींच्या स्मरणरूपी तेलाने ।
प्रज्वलित करूया आत्मज्योती ।। २ ।।
‘दीपावलीला बाह्य दिव्यांच्या दीपोत्सवासह आंतरिक गुणदीपांनी आपल्या सर्वांची अंतःकरणे उजळून निघोत. आपल्या मनरूपी गाभार्यातील भगवद्मूर्तीचे दिव्य रूप त्या दीपप्रकाशात न्याहाळता येवो आणि या दीपावलीला मोक्षलक्ष्मी अन् आत्मकल्याणरूपी लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होऊन साधकांना आध्यात्मिक दीपोत्सव साजरा करता येवो’, हीच लक्ष्मीदेवीच्या चरणी प्रार्थना !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (२८.१०.२०२४)
५. संतानलक्ष्मी
‘संतानलक्ष्मी’ ही गुणवान आणि निरोगी अपत्याचा आशीर्वाद देणारी देवता आहे. देवता, ऋषिमुनी, मानव आणि दानव हे देवीच्या चरणी शरणागत असतात. संतानलक्ष्मी हे स्नेह, कारुण्य, वात्सल्य आणि प्रीती यांचे प्रतीक आहे. ‘संतानलक्ष्मी’ ही देवी संपूर्ण मानवजातीवरच नव्हे, तर प्रत्येक योनीतील आपल्या पुत्रावर वात्सल्याची पखरण करते.
५ अ. ‘प्रीती’ची शिकवण देणारी ‘संतानलक्ष्मी’ ! : पुत्रावर मातेपेक्षा अधिक वात्सल्य कुणीच करू शकत नाही; म्हणूनच आद्य शंकराचार्यांनी ‘देव्यपराधक्षमापन स्तोत्रा’त म्हटले आहे, ‘कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ।’ (देव्यपराधक्षमापनस्तोत्र, श्लोक २) , म्हणजे ‘कुपुत्र (वाईट पुत्र) जन्माला येईल; पण कुमाता (वाईट माता) कदापि नसते.’ यातूनच आपल्याला मातेच्या परम कृपेची अन् कारुण्याची साक्ष पटते.
श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेत ‘प्रीती’, म्हणजे ‘निरपेक्ष प्रेम’ हे महत्त्वपूर्ण अंग सांगितले आहे. अष्टांग साधनेतील ‘प्रीती’ या गुणाची वृद्धी करण्यासाठी आपल्याला प्रीतीमय संतानलक्ष्मीविना आणखी
मोठा आशीर्वाद कोण देऊ शकेल ? म्हणूनच सर्वांनी संतानलक्ष्मीला शरण जाऊन आपल्यातही प्रीती निर्माण करण्यासाठी तिला प्रार्थना करायला हवी.
५ आ. श्री संतानलक्ष्मीच्या चरणी प्रार्थना ! : ‘हे संतानलक्ष्मी, आम्ही तुझीच लेकरे आहोत. जीवनातील प्रत्येक संकटातून तू आम्हा बालकांचे रक्षण करतेस. तुझी कृपादृष्टी सदैव आमच्यावर असू दे. तुझ्याप्रमाणे आमच्यावरही अपार करुणा आणि प्रीती यांचा संस्कार होऊ दे. तुझ्याप्रमाणे आम्हालाही सर्वांवर निरपेक्ष प्रेम करता येऊ दे’, अशी तुझ्या श्री चरणी प्रार्थना आहे.
६. धैर्यलक्ष्मी
जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी धैर्य, शक्ती आणि सामर्थ्य देणारी देवता, म्हणजे ‘धैर्यलक्ष्मी’ ! शास्त्रवचने सदैव धैर्यलक्ष्मीचे पूजन करतात. ही देवी भौतिक आणि आध्यात्मिक आवश्यकतांच्या पूर्ततेतील अडथळे दूर करते. मनुष्य त्याच्या जीवनातील ज्या कृती आत्मविश्वास, धीर आणि क्षात्रवृत्ती यांसह करतो, तो आत्मविश्वास अन् क्षात्रवृत्ती यांत धैर्यलक्ष्मी वास करत असते. तिच्या कृपेमुळेच मनुष्याला ते कार्य करणे शक्य होत असते.
६ अ. अहं-निर्मूलनासाठी धैर्य देणारी ‘धैर्यलक्ष्मी’ ! : सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेमध्ये ‘अहं-निर्मूलन’, हे एक महत्त्वाचे अंग आहे. अहंकारामुळे मनुष्याची पुष्कळ हानी होते. तो त्यात इतका गुरफटलेला असतो की, अहंकार सुटता सुटत नाही. जरा काही घडले की, तो लगेच दुःखी होतो. अहं-निर्मूलनाचे प्रयत्न करण्यासाठी धैर्य असावे लागते. ‘धैर्यलक्ष्मी’ ही देवी आपल्यातील आंतरिक असुरांचे, म्हणजेच अहंकाराचे निर्दालन करण्यासाठी शौर्य आणि धैर्य प्रदान करते. साधकाच्या मनातील प्रत्येक अहंयुक्त विचाराला ठेचण्यासाठी ती बळ प्रदान करते. आपल्याकडून प्रयत्न करून घेऊन ती आपला आत्मविश्वासही वाढवते.
६ आ. श्री धैर्यलक्ष्मीच्या चरणी प्रार्थना ! : आत्मविश्वास आणि धैर्य यांचा वास असणार्या हे धैर्यलक्ष्मी, ‘व्यष्टी आणि समष्टी साधना करत असतांना आम्हाला आमच्यातील अहंकाराशी लढण्यासाठी धैर्य अन् क्षात्रवृत्ती प्रदान कर. आमच्या रंध्रारंध्रात तुझा वास अखंड असू दे. आमच्या जीवनातील प्रत्येक अडथळ्याला सामोरे जाता येण्यासाठी तूच आम्हाला आत्मविश्वास अन् धैर्य प्रदान कर’, अशी तुझ्या सामर्थ्यशाली श्री चरणी आमची प्रार्थना आहे.
७. विजयलक्ष्मी
‘विजयलक्ष्मी’ हे देवीचे विजय मिळवून देणारे रूप आहे. केवळ युद्धांमध्येच नाही, तर कोणत्याही कृतीत येणार्या अडथळ्यांवर मात करण्याची आणि विजय मिळवण्याची क्षमता विजयलक्ष्मी प्रदान करते. या देवीला ‘जयलक्ष्मी’ म्हणूनही ओळखले जाते. चिंतेपासून मुक्ती मिळून विजय प्राप्त होण्यासाठी देवीच्या या रूपाची पूजा केली जाते.
७ अ. ‘सत्सेवे’साठी आशीर्वाद प्रदान करणारी ‘विजयलक्ष्मी’ ! : सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेतून शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी ‘सत्सेवा’ हे माध्यम दिले आहे. सत्सेवा, म्हणजेच अध्यात्मप्रसार, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी करायचे प्रयत्न. विजयलक्ष्मी हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यार्थ क्षणोक्षणी आपल्या पाठीशी उभी राहून आपल्याला सातत्याने बळ देत आहे. ‘त्या जगदंबिकेच्या कृपेने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील समस्त अडथळे दूर होणार आणि हिंदु राष्ट्र येणार’, हेही निश्चितच आहे ! आपल्या सर्वांना हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी बळ प्रदान करण्यासाठीच देवी जगदंबेचे ‘विजयलक्ष्मी’ हे रूप कार्यरत झाले आहे. आपण सर्वांनी शरणागतभावाने देवीला हिंदु राष्ट्रासाठी साकडे घालूया.
७ आ. श्री विजयलक्ष्मीच्या चरणी प्रार्थना ! : ‘हे विजयलक्ष्मी, तू विजय मिळवून देणारी देवी आहेस. श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांचे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करण्यासाठी तू आम्हाला बळ प्रदान कर. प्रत्येक सेवा ही आमच्याकडून ‘सत्सेवा’ म्हणून घडू दे. त्यासाठी तुझ्या कृपेचा वर्षाव आमच्यावर सदोदित होऊ दे. हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या रूपातील विजयोत्सवाचा आनंद लुटता येण्यासाठी आम्हाला आशीर्वाद दे’, अशी आम्ही तुझ्या श्री चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो.
८. विद्यालक्ष्मी
‘विद्यालक्ष्मी’ ही विद्या, ज्ञान आणि विवेक यांची देवता आहे. ती विवेकबुद्धी, ज्ञान आणि आत्मविश्वास देते. ती जिवाची क्षमता आणि प्रतिभा उजळवणारी देवता आहे. विद्यार्थीदशेत लक्ष्मीच्या या रूपाचे ध्यान करतात. विद्यालक्ष्मी ही ज्ञान आणि विद्या प्रदान करण्यासह आध्यात्मिक जीवन जगण्यासही साहाय्य करते.
८ अ. साधकांना स्वभावदोष-निर्मूलनाची विद्या प्रदान करणारी ‘विद्यालक्ष्मी’ ! : अंतःकरण निर्मळ आणि शुद्ध झाल्याविना त्यामध्ये असलेल्या भगवंताला ओळखता किंवा अनुभवता येत नाही; म्हणून अंतःकरण पवित्र अन् निर्मळ करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या अंतरातील स्वभावदोषरूपी अडथळे नष्ट करण्याची विद्या आवश्यक आहे. ही विद्या साक्षात् श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेतील ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिये’च्या रूपाने सर्वांना प्रदान केली आहे. जो साधक ही प्रक्रिया तळमळीने राबवण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्या अंतरात स्वतःला पालटण्याची आणि स्वयंशुद्धीची तळमळ जागृत असते, त्याच्यावर ही देवी कृपावंत होते. साधकांनी स्वतःला पालटण्याची तळमळ अंतरात जागृत होण्यासाठी विद्यालक्ष्मीला शरण जायला हवे.
८ आ. श्री विद्यालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना ! : ‘हे विद्यालक्ष्मी, स्वभावदोष आणि अहंकार यांमध्ये गुरफटलेल्या, अंधकारात चाचपडत असलेल्या सर्व जिवांना खरे ज्ञान प्रदान कर अन् त्या ज्ञानाने सर्वांचे जीवन उजळू दे. तूच साधकांकडून अष्टांग साधनेतील स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया तळमळीने राबवून घे आणि त्यातून सर्वांची साधना करून घे’, अशी तुझ्या परम तेजस्वी श्री चरणी प्रार्थना आहे.’
(समाप्त)
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) (२८.१०.२०२४)