चांदीच्या नाणे वाटपासाठी पुणे विद्यापिठाचा लाखो रुपये खर्च !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे बोधचिन्ह असलेले ७५ ग्रॅम चांदीचे नाणे

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यापिठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना विद्यापिठाचे बोधचिन्ह असलेले ७५ ग्रॅम चांदीचे नाणे देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापिठाने लाखो रुपये खर्च केले आहेत. विद्यापिठाची आर्थिक स्थिती अडचणीची असल्याचे सांगितले जात असतांना चांदीच्या नाण्यांवर खर्च करण्याची काय आवश्यकता ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. विद्यापिठातील १ सहस्रांहून अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना हे नाणे देणार असल्याचे विद्यापिठातील सूत्रांनी सांगितले. विद्यापिठातून निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना सोन्याचे नाणे देण्याची पद्धत आहे. या सूत्रावरही अधिसभेत वाद झाला होता. एकीकडे आर्थिक अंदाजपत्रकात तूट दाखवली जात असतांना दुसरीकडे चांदीचे नाणे देणे हा विरोधाभास आहे. ‘विद्यापिठातील कर्मचार्‍यांनी दिलेल्या योगदानासंदर्भात अधिकार मंडळांनी घेतलेल्या निर्णयान्वये त्यांना स्मृतीचिन्हही देण्यात येणार आहे’, असे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी स्पष्ट केले. ‘विद्यापिठातील विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या समस्या न सोडवता विद्यापिठाने चांदीचे नाणे वाटणे योग्य नाही’, असे ‘विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती’चे राहुल ससाणे यांनी सांगितले.