सहनशील आणि व्यष्टी साधनेची आवड असणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा भुसावळ (जिल्हा जळगाव) येथील कु. शिवप्रसाद उमेश जोशी (वय ८ वर्षे)!

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. शिवप्रसाद उमेश जोशी हा या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२३ मध्ये कु. शिवप्रसाद याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के होती.’- संकलक)

२८.१०.२०२४ (आश्विन कृष्ण द्वादशी) या दिवशी भुसावळ (जिल्हा जळगाव) येथील कु. शिवप्रसाद उमेश जोशी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. 

कु. शिवप्रसाद जोशी
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कु. शिवप्रसाद उमेश जोशी याला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद ! 

सौ. विनया जोशी

१. परिस्थिती स्वीकारणे  

‘कु. शिवप्रसाद ६ वर्षांचा असतांना आम्ही भुसावळ शहर सोडून गावी स्थलांतर केले. त्या वेळी शिवप्रसादने कोणतेही गार्‍हाणे केले नाही. त्याने गावातील परिस्थिती स्वीकारली, उदा. गावातील शाळा, वीज नसणे इत्यादी.

२. सहनशील

२ अ. त्वचाविकार बरा होण्यासाठी कडू औषधे घेणे आणि पथ्य पाळणे : काही मासांपासून ‘शिवप्रसादच्या त्वचेला खाज येणे, पुरळ येणे’, असे त्रास होत आहेत. त्यासाठी त्याला कडू औषधे घेऊन कडक पथ्य पाळावे लागते. ‘तो औषधे घेईल का ? किंवा पथ्य पाळेल का ?’, असे आरंभी वैद्यांना वाटत होते; पण त्याने गार्‍हाणे न करता नियमितपणे औषधे घेतली आणि पथ्य पाळले.

२ आ. बोटाच्या शस्त्रकर्माच्या वेळी होणार्‍या वेदना सहन करणे : एकदा शिवप्रसादच्या हाताच्या बोटातील नखामध्ये लोखंडाचे कण खोलपर्यंत घुसले होते. आधुनिक वैद्यांना दाखवल्यावर ते म्हणाले, ‘‘त्याच्या बोटाचे नख काढून टाकावे लागेल आणि त्यासाठी शस्त्रकर्म करावे लागेल.’’ त्याने ‘रक्त तपासणे, भूल देणे, शस्त्रकर्म करणे’, या वेळी होणार्‍या वेदना धैर्याने सहन केल्या. तेव्हा वैद्यांनी त्याचे कौतुक केले.

३. सर्वांचा आवडता  

कु. शिवप्रसाद शाळेत सर्व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी आहे. तो एखाद्या दिवशी शाळेत गेला नाही, तर शिक्षक त्याची विचारपूस करतात. नातेवाईक, शेजारी, त्याचे मित्र आणि साधक यांना तो हवाहवासा वाटतो.

४. कौतुक केलेले न आवडणे  

एकदा शिवप्रसादची आजी त्याला मंदिरात घेऊन गेली. तिने तेथील महिलांपुढे त्याचे कौतुक केले. तेव्हा त्याने घरी येऊन मला सांगितले, ‘‘आजी सगळ्यांपुढे माझे कौतुक करत होती. ते मला आवडत नाही. असे केले, तर मी आजीच्या समवेत जाणार नाही.’’

५. व्यष्टी साधनेची आवड 

त्याला स्वभावदोष-निर्मूलनासाठीचे सारणी लिखाण करायला आवडते. तो सारणीत चुका लिहितो आणि ‘त्यामध्ये माझा कोणता स्वभावदोष आहे ?’, याविषयी मला विचारतो. त्याला व्यष्टी साधनेचा आढावा देण्याची आवड आहे. ‘मी आढावा कुणाला देऊ ?’, असे तो मला नेहमी विचारतो.

६. तो शाळेत जाण्यापूर्वी ३० मिनिटे दत्ताचा नामजप करतो आणि महाप्रसाद ग्रहण करण्यापूर्वी प्रार्थना करतो.

७. शिवप्रसाद शाळेत जातांना प्रतिदिन टिळा लावतो. त्याला राष्ट्रध्वज आणि सैनिक आवडतात. ‘पुढे मी सैनिक होईन’, असे तो सांगतो.

– सौ. विनया उमेश जोशी (कु. शिवप्रसाद याची आई), भुसावळ, जिल्हा जळगाव. (१४.१०.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.