उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
वॉशिंग्टन (अमेरिका) – आता अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला जेमतेम आठवडा उरला आहे. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस या दोन्ही उमेदवारांनी त्यांचा निवडणूक प्रचार तीव्र केला असून एकमेकांवर शाब्दिक आक्रमणेही तीव्र केली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनियामध्ये निवडणूक प्रचाराच्या वेळी म्हटले की, जर कमल हॅरिस राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या, तर अमेरिका तिसर्या महायुद्धात अडकेल, याची निश्चिती आहे; कारण त्यांना जागतिक घडामोडींविषयी काहीच माहिती नाही आणि त्यांना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग अन् रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी कसे बोलावे ?, हेही ठाऊक नाही.
ट्रम्प पुढे म्हणाले की, कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्ष बनवणे म्हणजे देशातील लाखो लोकांच्या मुलांच्या जिवाशी जुगार खेळण्यासारखे आहे. महायुद्धाचा धोका जेवढा सध्या आहे, तेवढा तो यापूर्वी कधीच नव्हता. मी राष्ट्राध्यक्ष पदावर असतो, तर इस्रायलवर ७ ऑक्टोबरला झालेले आक्रमण झाले नसते.