लंडन (ब्रिटन) – भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबरला निधन झाले. आता ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापिठाने रतन टाटा यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठ रतन टाटा यांच्या नावाने एका नवीन इमारतीची उभारणी करणार आहे. टाटा ग्रुप आणि ऑक्सफोर्ड विद्यापिठातील सोमरविले कॉलेज यांच्याकडून ही इमारत उभारण्यात येणार आहे. त्याचा उद्देश ‘विद्यापिठातील अध्यापन आणि शैक्षणिक उपक्रम अधिक दर्जेदार बनवणे’, हा आहे.
पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑक्सफोर्ड विद्यापिठातील ‘रॅडक्लिफ ऑब्जर्वेटरी क्वार्टर’मध्ये या इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे. ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन्. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, रतन टाटा यांच्या नावाने बांधलेली इमारत भारतासाठी महत्त्वाचे संशोधन केंद्र ठरणार आहे. रतन टाटा यांनी मानवतेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याचा हा गौरव आहे.