पर्यटन खाते ‘एकादश तीर्थ सर्किट’ योजनेच्या अंतर्गत ११ मंदिरांच्या व्यवस्थापनांसमवेत करार करणार
पणजी, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – पर्यटन खाते गोव्यातील धार्मिक स्थळांकडे देशी आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी खाते ‘एकादश तीर्थ सर्किट’ ही योजना राबवत आहे. या अंतर्गत खाते राज्यातील ११ मंदिरांच्या व्यवस्थापनांसमवेत करार करणार आहे. यासाठी मंदिर परिसरात पर्यटकांना सुलभ होईल अशी साधनसुविधा उभारण्याचा आणि विशेष म्हणजे गोव्यातील मंदिर संस्कृती अन् आध्यात्मिक महत्त्व अबाधित ठेवण्याचा खात्याचा प्रयत्न आहे.
गोवा पर्यटन विकास महामंडळाने यासंबंधी सविस्तर प्रकल्प अहवाल सिद्ध केला आहे. ‘एकादश तीर्थ सर्किट’ योजनेमध्ये गोव्यातील श्री ब्रह्माकरमळी मंदिर, सत्तरी; श्री दामोदर देवस्थान, जांबावली; श्री दत्तात्रेय मंदिर, सांखळी; श्री हरि मंदिर, मडगाव; श्री महादेव मंदिर, तांबडी सुर्ला; श्री महागणपति मंदिर, खांडोळा; श्री महालसा मंदिर, म्हार्दाेळ; श्री परशुराम मंदिर, पैंगीण, काणकोण; श्री सप्तकोटेश्वर मंदिर, नार्वे; श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण, फातर्पा आणि श्री मंगेश मंदिर, मंगेशी या ११ मंदिरांचा समावेश आहे. खाते या योजनेचा प्रसार सामाजिक माध्यमे आदी डिजिटल माध्यमांचा वापर करून करणार आहे. यासाठी ‘टुर ऑपरेटर्स’चे साहाय्य घेतले जाणार आहे. पर्यटकांना समुद्रकिनारपट्टीपेक्षा निराळ्या गोव्याचा अनुभव देणे आणि गोव्यातील पवित्र वारसा यांविषयी माहिती देण्यासाठी सरकार ही योजना राबवत आहे. या योजनेच्या अंतर्गत पर्यटक स्थानिक संस्कृती आणि जीवनशैली यांच्यात मिसळणार आहेत. यामुळे एरव्ही मंदिर पहाण्यासाठीच्या दौर्यांपेक्षा ‘एकादश तीर्थ सर्किट’ योजना निराळी आहे.