परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा ठेवून प्रत्येक क्षणी त्यांचे अस्तित्व अनुभवणार्‍या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील सौ. राधिका कोकाटे !

सौ. राधिका कोकाटे

१. विवाहापूर्वी केलेले साधनेचे प्रयत्न आणि  अनुभवलेली गुरुकृपा 

१ अ. गावाहून मुंबईला गेल्यावर काम आणि सेवा करण्यास आरंभ करणे : ‘माझ्या विवाहापूर्वी एकदा मी गावाकडील शेतीची सर्व कामे झाली असल्याने मुंबईला गेले. तेथे माझे बाबा आणि माझी लहान बहीण रहात होती. मी तिकडे नोकरीसाठी जाण्यास आरंभ केला आणि वेळ मिळाल्यावर बहिणी समवेत सेवेलाही जात होते. त्या वेळी मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने यांच्या वितरणाची सेवा करत होते.

१ आ. ‘देव चांगलेच करणार’, अशी आईची श्रद्धा असणे : आई-वडिलांना नातेवाईक माझ्या विवाहाविषयी विचारायचे. प्रतिदिन एक स्थळ यायचे. त्यावर आई म्हणायची, ‘‘मी तिला विचारते, मग तुम्हाला निरोप देते.’’ गावी सणांसाठी गेल्यावर नेमके कुणीतरी स्थळांविषयी निरोप द्यायचे; म्हणून मी गावी जाण्याचे टाळत होते. त्यावर आई म्हणायची, ‘‘तुझ्या मनात जे आहे, ते करूया. देव तुमचे चांगले करणार ! देव आपल्या पाठीशी आहे; म्हणून आपले सर्व चालू आहे.’’

१ इ. परात्पर गुरु डॉक्टरांना ‘तुमच्याच नियोजनानुसार विवाह होऊ दे’, अशी प्रार्थना केल्यावर विवाहासाठी साधकाचे स्थळ येणे : एकदा मी कामावरून येतांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करून संध्याकाळी घरी आले. देवासमोर दिवा लावून गुरुस्मरण करून नामजप केला. नंतर परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘माझा विवाह तुमच्या नियोजनानुसार होऊ दे, तुम्हीच सर्व ठरवा, तुम्हाला अपेक्षित असेच घडू दे, तुम्हीच माझे सर्वस्व आहात.’ त्याच वेळी गावाहून भावाचा भ्रमणभाष आला, ‘तुझ्यासाठी एक स्थळ आले आहे आणि तो मुलगा साधक आहे.’ त्यावर मी लगेच लग्नासाठी होकार दिला. ‘गुरुदेव माझ्यासाठी किती करतात !’, असे मला वाटले आणि माझी पुष्कळ भावजागृती झाली.

१ ई. विवाहासाठी आलेले स्थळ म्हणजे ‘गुरुदेवांनी दिलेला प्रसाद आहे’, असा भाव ठेवून विवाहासाठी होकार देणे : ‘विवाहासाठी आलेले साधकाचे स्थळ, म्हणजे त्या क्षणी मिळालेले गुरुचरणांचे फूल आणि प्रसाद आहे’, असे मला वाटले आणि पुढे मी काहीच विचारले नाही. ‘देहाने कसाही असू दे. मला माझ्या गुरुदेवांनी दिला आहे’, असा मी भाव ठेवला. नंतर काही वेळाने पुन्हा भ्रमणभाषवर भावाने सांगितले, ‘‘तो मुलगा सातार्‍याचा आहे. आपल्या गावापासून पुष्कळ दूर आहे. तिकडची गावे आपण कधी पाहिली नाहीत.’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘या लग्नासाठी माझी सिद्धता आहे. गुरुदेवांवर तुमचा विश्वास आहे ना ? मग काहीच विचार करायचा नाही.’’

हा प्रसंग मी एकदा गुरुदेवांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘आई-वडिलांनाही आनंद झाला असेल !’’ मी म्हणाले, ‘‘हो, त्यांना आनंद झाला.’’

२. विवाहानंतर अनुभवलेली गुरुकृपा आणि गुरुदेवांच्या शिकवणीमुळे कुटुंबियांना मिळालेला आनंद 

२ अ. विवाहानंतर नवीन गोष्टी शिकण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करणे : वर्ष २०१५ मध्ये आमचा विवाह मिरज येथील सनातनच्या आश्रमात झाला. विवाहानंतर मी तिकडे गेल्यावर मला तिकडचे हवामान, जेवण आणि तिकडची माणसे सर्वच वेगळे वाटले. मी सतत गुरुदेवांना प्रार्थना करायचे, ‘मला या सर्व नवीन गोष्टी तुम्हीच शिकवा.’

२ आ. यजमान आणि सासू-सासरे यांनी समजावून सांगितल्यामुळे नवीन भाषा आणि स्वयंपाक येणे : मला यजमान सर्व समजावून सांगायचे. माझे सासू-सासरे पुष्कळ साधे आणि प्रेमळ आहेत. ते मला समजून घ्यायचे. आरंभी तिकडची भाषा मला समजायची नाही. नंतर हळूहळू मला सर्व जमू लागले आणि तिकडचा स्वयंपाक करता येऊ लागला.

२ इ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे आश्रमात शिकायला मिळालेल्या गोष्टी कुटुंबियांना सांगितल्यावर त्यांनीही त्यातला आनंद अनुभवणे

२ इ १. ‘घरामध्ये बनवलेले अन्न वाया जाऊ नये’, यासाठी आश्रमात शिकवल्याप्रमाणे स्वयंपाकाचे नियोजन केल्यावर स्वयंपाक करतांना आनंद मिळणे : आम्ही घरी गेल्यावर माझ्या मोठ्या जाऊबाई सर्वांसाठी स्वयंपाक करायच्या. त्या कधी कधी अधिक प्रमाणात स्वयंपाक करायच्या. त्यामुळे शिल्लक राहिलेले अन्न दुसर्‍या दिवशी खराब झाल्यामुळे टाकावे लागायचे. मी सासूबाईंना सांगितले, ‘‘आपल्याकडे अन्न पुष्कळ वाया जाते. पुढे आपत्काळात आपल्याला अन्न पुरवून वापरायचे आहे. त्यामुळे स्वयंपाक आवश्यक तेवढाच करायला तुम्ही जाऊबाईंना सांगा. प्रत्येकाला किती जेवण लागते ?, ते विचारून त्या प्रमाणात स्वयंपाक कसा करायचा ?, ते आश्रमात आम्हाला गुरुदेवांनी शिकवले आहे.’’ नंतर मी आश्रमात स्वयंपाक कसा करते ?, ते जाऊबाईंना दाखवले. नंतर त्याही तसा स्वयंपाक करायला शिकल्या. ‘मी हे सर्व गुरुदेवांच्या कृपेने आश्रमातच शिकले आणि देवानेच हे शिकवले’, असे सांगितल्यावर त्यांना आनंद झाला. मी गावी गेल्यावर आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करतो. नंतर मला स्वयंपाक करतांना ‘मी आश्रमातच आहे’, असे वाटू लागले.

२ इ २. ‘घरातील सर्वांनी आश्रमात सांगितल्याप्रमाणे कृती केल्यामुळे घर हे आश्रमच आहे’, असे वाटणे : आम्ही आश्रमातून घरी गेल्यावर सर्वांना लहान लहान कृती व्यवस्थित करायला सांगतो. घरातील सर्व जण तशी कृती करतात. घरी गेल्यावर ‘सर्व जण एकमेकांच्या समवेत चांगले राहिल्यामुळे घर हे आश्रमच आहे’, असेच वाटते.

गुरुदेवांनी ‘प्रत्येक गोष्टीला कसे सामोरे जायचे ? नवीन गोष्टी कशा शिकायच्या ?’, हे मला शिकवले. गुरुमाऊलीने (परात्पर गुरु डॉक्टरांनी) मला जीवनात पुष्कळ काही शिकवले आणि अजूनही शिकवत आहेत. मला हे सर्व केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळेच शक्य झाले. ’याच जन्मी नतमस्तक होतो गुरुदेवांच्या चरणी.

‘आम्हाला सतत गुरुस्मरणात रहाता येऊ दे. त्या आनंदाच्या डोहात आम्हाला न्हाऊन जाता येऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे. हे सर्व लिखाण करतांना भावजागृती होत होती. ‘गुरुदेव किती करतात !’, असे सारखे शब्द आठवत होते.  याविषयी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. राधिका रामदास कोकाटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक