मुंबई – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून अवघ्या ९ दिवसांत महाराष्ट्रात तब्बल ४४ कोटी ८० लाख रुपयांचा अवैध मालमत्तेचा साठा पोलिसांनी पकडला आहे. यामध्ये मद्य, पैसा, अमली पदार्थ आणि मौल्यवान वस्तू यांचा समावेश आहे.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. वरील कारवाई १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार ‘सी-व्हिजिल ॲप’वर नोंदवण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांमध्ये १३९ सामान्य निरीक्षक, ४१ पोलीस निरीक्षक आणि ७१ व्यय निरीक्षक नियुक्त केले आहेत.
आचारसंहिता भंगाच्या ९९५ तक्रारी निकाली !
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल ॲप’ (C-Vigil app) वर एकूण १ सहस्र ११ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यांतील ९९५ तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. राज्यात सर्वाधिक २११ तक्रारी पुणे जिल्ह्यात, तर त्याखाली मुंबई उपनगरात १२६ तक्रारी आल्या.