राहुल गांधी यांना न्यायालयामध्ये उपस्थित रहाण्यासाठी पतियाळा न्यायालयाकडून नोटीस !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण !

पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुणे विशेष न्यायालयाने नोटीस बजावली होती. आता ती नोटीस देहलीतील पतियाळा न्यायालयाकडून बजावण्यात येणार आहे. याविषयी पतियाळा न्यायालयाने पुणे विशेष न्यायालयाला तशी सूचना केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा दावा प्रविष्ट केला आहे.

या प्रकरणी २३ ऑक्टोबर या दिवशी राहुल गांधी यांनी स्वत: किंवा अधिवक्त्यांकडून बाजू मांडण्यास सांगितले होते. ही नोटीस पुणे विशेष न्यायालयाकडून देहलीतील पतियाळा न्यायालयाकडे पाठवण्यात आली होती. त्यावर पतियाळा न्यायालयाने संबंधित नोटीस मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी पतियाळा न्यायालयाकडून बजावण्यात यावी, अशी सूचना केली होती, अशी माहिती सात्यकी सावरकर यांचे अधिवक्ता संग्राम कोल्हटकर यांनी दिली आहे. या दाव्याची सुनावणी विशेष न्यायालयामध्ये होणार आहे.