मालवण – राज्यातील सुर्जी अंजनगाव, अमरावती येथील देवनाथ मठाचे मठाधिपती श्री श्री १००८ अनंत श्रीविभूषित श्रीनाथपीठाधीश्वर आचार्य सद्गुरु श्रीजितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते मालवण तालुक्यातील वायंगणी येथील वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणेगुरुजी यांना यावर्षीचा ‘वैदिकसम्राट पं. श्रीकृष्णशास्त्री गोडशेगुरुजी राष्ट्रीय पंडित पुरस्कार २०२४’ हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नाशिक येथील वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय (गुरुकुल, वेद पाठशाळा) येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला.
सनातन भारतीय परंपरा जपण्याचे आणि संवर्धित करण्याचे पवित्र कार्य गुरु-शिष्य परंपरेने भारतात अन् पाश्चात्त्य देशांत केले आणि करतही आहेत. ही संस्कृती निष्ठेने आणि व्रत म्हणून जपणार्या वेदोपासकांची परंपरा आपल्या देशात आहे. अशा वंदनीय वेदोपासकांना वैदिकसम्राट गुरुवर्य पंडित श्रीकृष्णशास्त्री गोडशेगुरुजी यांच्या पुण्यस्मरणार्थ प्रतिवर्षी ‘राष्ट्रीय पंडित पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी पंडित गोडशेगुरुजी यांच्या असलेल्या १६ व्या पुण्यस्मरणार्थ वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणेगुरुजी यांना हा बहुमान देऊन गौरवण्यात आले.
वेदमूर्ती मुरवणेगुरुजी यांचा परिचय
वायंगणी येथील वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणेगुरुजी यांचे शालेय शिक्षण झाल्यानंतर पुणे येथील तांबडी जोगेश्वरी पाठशाळेत वेदमूर्ती दिनकरभट्ट माधव फडके गुरुजी घनपाठी यांच्याकडे ऋग्वेदाचे दशग्रंथघनांत अध्ययन पूर्ण केले. वर्ष १९९१ आणि ९२ ही २ वर्षे नाशिक येथे गुरुगंगेशवर वेदविद्यालयात अध्यापन केले. वर्ष १९९३ पासून वायंगणी येथे ‘ऋवेद गुरुकुल’ चालू करून अध्यापनास प्रारंभ केला. आतापर्यंत त्यांच्याकडील
१५ विद्यार्थ्यांनी दशग्रंथ घनांत अध्ययन पूर्ण केले. त्यांचे अनेक विद्यार्थी वेद आणि शास्त्र अध्यापनाचे कार्य करत आहेत. त्यांच्या गुरुकुलात सध्या ३० विद्यार्थी वेदाध्ययन करत आहेत. वेदमूर्ती मुरवणेगुरुजी यांना यापूर्वी महाराष्ट्र राज्यशासनाचा ‘कवि कुलगुरु कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. आता ‘राष्ट्रीय पंडित पुरस्कार’ प्राप्त झाल्याने त्यांच्यावर समाजातील विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.