खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची गरळओक
न्यूयॉर्क (अमेरिका) – माझ्या कपाळावर माझ्या मृत्यूची वेळ आणि दिवस लिहिलेला आहे. मला कितीही धमकावले, तरी मी खलिस्तानच्या संदर्भातील सार्वमत चालवणे थांबवणार नाही. भारत अजूनही माझ्या हत्येचा कट रचत आहे. मला अजूनही भारताकडून धोका आहे, अशी गरळओक ‘शीख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने केली. कॅनडाच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने वरील आरोप केले.
पन्नू पुढे म्हणाला की,
१. जो कुणी भारताच्या विरोधात जाईल, त्याच्या विरुद्ध कारवाई केली जाईल आणि त्याला ठार केले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत म्हटले होते. (अशा प्रकारे धादांत खोटे वक्तव्य करून भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणार्यावर भारताने आता कारवाई करूनच दाखवली पाहिजे. – संपादक) दुसरीकडे कॅनडातील भारताचे माजी उच्चायुक्त संजय कुमार वर्मा म्हणाले होते की, आम्ही कोणत्याच देशाच्या भूमीवर अशी कोणतीच कारवाई करत नाही, ज्यामुळे त्या देशाच्या कायद्याचा प्रश्न उपस्थित होईल.
२. अमेरिकेत माझ्या हत्येचा प्रयत्न झाला. तपासात ‘रॉ’चा हस्तक निखिल गुप्ताचे नाव पुढे आले.
३. हरदीप सिंह निज्जरला मारण्यासाठी नेमबाज नेमले गेले. पंजाबींसाठी वेगळ्या देशाच्या मागणी करणार्या निज्जरची हत्या झाली. निज्जर हा खलिस्तान सार्वमताचा प्रमुख नेता होता. निज्जर याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ‘वाँटेड’ (हवा असलेला) घोषित केले होते.
४. भारत सरकार पंजाब पोलिसांच्या ‘काउंटर इंटेलिजन्स विंग’च्या सतत संपर्कात आहे. सरकारला शिखांकडूनच माझी हत्या करवून घ्यायची आहे. असे असले, तरी मी खलिस्तानसाठी सार्वमत घेणे थांबवणार नाही.
संपादकीय भूमिकापन्नूच्या बोलण्यात तथ्य असते, तर तो हे बोलण्यासाठी जीवितच राहिला नसता. त्याला भारताने केव्हाच यमसदनी धाडले असते ! |