१० सहस्र बेकायदेशीर बांधकामे होत असतांना काय केले ?

मुंबई उच्च न्यायालयाचा नवी मुंबई महापालिकेला प्रश्न !

मुंबई उच्च न्यायालय

नवी मुंबई – १० सहस्र बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत, ती होत असतांना तुम्ही काय करत होतात ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला विचारला आहे. येथील बेकायदेशीर बांधकामांच्या विरोधात जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपिठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. येथील १ सहस्र ४२ अवैध बांधकामांवर फौजदारी कारवाईसाठी काय करण्यात आले, याची माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने  आयुक्तांना दिले आहेत. बेकायदेशीर बांधकामे कशी शोधतात, हे तुम्हाला ठाऊक नाही. न्यायालयात प्रकरण आल्यावर तुम्हाला जाग येते. त्यानंतर तुम्ही गुन्हा नोंद न करता केवळ तक्रार प्रविष्ट करून घेता, अशा शब्दांतही पालिकेला फटकारले.