डिचोली येथील केंद्रात प्रश्नपत्रिकेसमवेत उत्तरपत्रिकाही देण्यात आली !

  • गोवा शालांत मंडळाच्या ९ वीच्या परीक्षेत घोळ

  • शिक्षकाच्या सतर्कतेमुळे उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्या नाहीत.

पणजी, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – गोवा शालांत मंडळ यंदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता ९ वीच्या परीक्षा घेत आहे. मंडळाने डिचोली येथील एका केंद्रात उर्दू विषयाच्या प्रश्नपत्रिकेबरोबर उत्तरपत्रिकाही एकाच पाकिटात पाठवण्याचा प्रकार उघडकीस आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नववीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका गोवा शालांत मंडळाकडून काढण्यात येतात. शालांत मंडळाकडून प्रश्नपत्रिकेसमवेत उत्तरपत्रिकाही पाठवल्या जातात; परंतु प्रश्नपत्रिका एका पाकिटामध्ये, तर उत्तरपत्रिका दुसर्‍या पाकिटामध्ये असतात. उर्दू विषयाच्या प्रश्नपत्रिका पाठवतांना कुणीतरी कर्मचार्‍याने चुकून त्या प्रश्नपत्रिकेला जोडूनच उत्तरपत्रिकाही पाठवल्या. प्रश्नपत्रिका पाठवण्याचे दायित्व शालांत मंडळाचे असले, तरी ही चूक कनिष्ठ कर्मचार्‍याकडून करण्यात आली आहे. पाकिटे पाठवेपर्यंत ही चूक लक्षात आली नाही. डिचोली येथे एका विद्यालयात प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडण्यात आले, तेव्हा ही गोष्ट उघडकीस आली. गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये म्हणाले, ‘‘संबंधित परीक्षा केंद्रातील शिक्षकाने सतर्कतेने तात्काळ सर्व उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिकांपासून वेगळ्या केल्या. विद्यार्थ्यांना केवळ प्रश्नपत्रिकाच देण्यात आल्या.’’ राज्यात उर्दू विषय असलेल्या १० विद्यालयांपैकी एका विद्यालयात हा प्रकार घडला.

चौकशीचे आदेश दिले आहेत ! – भगीरथ शेट्ये, अध्यक्ष, गोवा शालांत मंडळ

गोवा शालांत मंडळाच्या चुकीमुळे हे घडले आहे. या प्रकरणी प्रश्नपत्रिकेला उत्तरपत्रिका का जोडण्यात आल्या ? आणि त्या कोणी जोडल्या ? याचे अन्वेषण केले जाणार आहे, अशी माहिती गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.