हिंदु आणि शीख कुटुंबांना दिवाळी आणि गुरु नानक जयंती यानिमित्त देणार १० सहस्र पाकिस्‍तानी रुपये !

  • पाकिस्‍तानमधील पंजाब सरकारचा निर्णय

  • बलुचिस्‍तानमध्‍ये हिंदु सरकारी कर्मचार्‍यांना ३ दिवसांची सुटी मिळणार  

प्रतिकात्मक छायाचित्र

लाहोर (पाकिस्‍तान) – पाकिस्‍तानच्‍या पंजाबच्‍या मुख्‍यमंत्री मरियम नवाज यांनी गुरु नानक जयंती आणि दिवाळी यांपूर्वी राज्‍यातील २ सहस्र २०० शीख आणि हिंदु कुटुंबांना प्रत्‍येकी १० सहस्र पाकिस्‍तानी रुपये (सुमारे ३ सहस्र भारतीय रुपये) देण्‍याचा निर्णय घेतला आहे. याखेरीज बलुचिस्‍तान सरकारनेही हिंदु कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त ३ दिवसांची सुटी घोषित केली आहे.

मरियम नवाज शरीफ

१. पंजाब सरकारच्‍या प्रवक्‍त्‍याने सांगितले की, मुख्‍यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना हिंदु आणि शीख बांधवांना ‘उत्‍सव कार्ड’ वितरित करण्‍याची प्रक्रिया त्‍वरित प्रारंभ करण्‍याचे निर्देश दिले आहेत. या वर्षापासून हिंदु आणि शीख कुटुंबांना उत्‍सव कार्ड कार्यक्रमाचा भाग म्‍हणून वार्षिक आर्थिक साहाय्‍य मिळणार आहे. याला पंजाब सरकारच्‍या मंत्रीमंडळाने संमती दिली आहे.

२. पाकिस्‍तानात यंदाची दिवाळी ३१ ऑक्‍टोबर ते २ नोव्‍हेंबर या कालावधीत साजरी होणार आहे. १५ नोव्‍हेंबरला गुरु नानक जयंती आहे. या जयंतीनिमित्त येणार्‍या परदेशी यात्रेकरूंसाठीही विशेष व्‍यवस्‍था करण्‍यात येत असल्‍याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

पाकमध्‍ये हिंदु आणि शीख यांचे रक्षण होणार आहे का ?, हाच मूळ प्रश्‍न आहे !