NASA Launches Europa Clipper : गुरू ग्रहाच्या ‘युरोपा’ नावाच्या चंद्रावर ‘नासा’ जीवसृष्टी शोधणार !

  • ‘युरोपा क्लिपर’ नावाचे अंतराळयान पाठवले !

  • वर्ष २०३० मध्ये गुरूच्या कक्षेत पोचणार !

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार सर्वांत सात्त्विक  असलेल्या गुरु ग्रहाच्या ‘युरोपा’ नावाच्या बर्फाळ चंद्रावर जीवसृष्टीच्या शोधासाठी अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’ने ‘युरोपा क्लिपर’ नावाचे एक अंतराळयान पाठवले आहे. फ्लॉरिडा येथील ‘केनेडी स्पेस सेंटर’ येथून इलॉन मस्क यांचे आस्थापन ‘स्पेसएक्स’च्या ‘फाल्कन हेवी रॉकेट’वरून या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले. ही मोहीम ६ वर्षे चालणार असून या कालावधीत यान ३ अब्ज किलोमीटरचे अंतर पार करणार आहे.  या मोहिमेसाठी नासाने ४३ सहस्र कोटी रुपये खर्च केले आहेत.

१. ‘युरोपा क्लिपर’ हे अंतराळयान ११ एप्रिल २०३० या दिवशी गुरूच्या कक्षेत प्रवेश करेल. यानंतर पुढील ४ वर्षांत ते ४९ वेळा ‘युरोपा’ चंद्राच्या जवळून जाईल.

२. शास्त्रज्ञांना वाटते की, ‘युरोपा’च्या बर्फाळ पृष्ठभागाच्या खाली पाण्याचे महासागर आहेत. त्यामुळे हा चंद्र रहाण्यायोग्य होऊ शकतो. त्यामुळे शास्त्रज्ञ या महासागरांची खोली जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. याखेरीज ते युरोपाच्या पृष्ठभागावर जीवनावश्यक असलेल्या इतर गोष्टींचाही शोध घेतील, तसेच ते चंद्राच्या पृष्ठभागावरील चुंबकीय क्षेत्रही तपासतील.