पुणे, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – शारदीय नवरात्रीनिमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील ‘चतुःशृंगी’ या स्वयंभू जागृत शक्तीस्थानाच्या ठिकाणी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आली होती. याचप्रकारे चिंचवड येथे भवानीमाता मंदिरातही प्रदर्शन कक्ष लावण्यात आला होता. सहस्रो भाविकांनी याचा लाभ घेतला. अन्य ३ ठिकाणी लहान-मोठे प्रदर्शन कक्ष लावण्यात आले होते, तर ९ ठिकाणी नवरात्रीविषयी मार्गदर्शन करणारी प्रवचने आयोजित केली होती. त्याचप्रमाणे ‘महिला सशक्तीकरण’ अंतर्गत स्वसंरक्षणाची जागृती करण्यात आली.
या वर्षी ‘महिला सशक्तीकरण’ या उपक्रमाच्या अंतर्गत महिलांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वसंरक्षणाची आवश्यकता अन् लव्ह जिहाद सारखी संकटे यांविषयी माहिती देऊन जागृती करण्यात आली. पुणे जिल्ह्यात एकूण ३ ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. १०० हून अधिक महिलांनी याचा लाभ घेतला. शेवाळवाडी येथील भैरवनाथ मंदिर, आंबावणे (ता. वेल्हा) परिंचे गाव येथील श्री तुकाईदेवी मंदिर, हडपसर, पारगाव, दौंड येथील श्री रेणुकामाता मंदिर आदी ठिकाणी प्रवचन, सामूहिक प्रार्थना उपक्रम घेण्यात आले. शेकडो भाविकांनी याचा लाभ घेतला.
धर्मप्रेमींनी केले उपक्रमाचे आयोजन !
पारगाव येथील धर्मप्रेमींनी श्री तुकाईमाता मंदिरात सामूहिक प्रार्थना उपक्रम घेतला. या वेळी ७०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. या सेवेत पारगाव शाखेतील १२ युवक सहभागी झाले होते. उपस्थित ग्रामस्थांनी उपक्रमाचे कौतुक केले.