गोव्यातील पहिलीच ‘बुलडोझर’ कारवाई
म्हापसा, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – म्हापसा नगरपालिकेने एकतानगर, हाऊसिंग बोर्ड, म्हापसा येथे सिद्दीकी उपाख्य सुलेमान खान याने बांधलेली ६ पक्की बांधकामे ११ ऑक्टोबर या दिवशी ‘जेसीबी’च्या साहाय्याने पोलीस संरक्षणात भूईसपाट केली आहेत. संशयित सुलेमान हा माडेल, थिवी येथील रहिवासी आहे. बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याच्या प्रकरणातील तो एक प्रमुख संशयित आहे. या प्रकरणाचे अन्वेषण विशेष अन्वेषण पथक करत आहे. भूमी बळकावल्याच्या प्रकरणी संशयिताचे अनधिकृत बांधकाम भूईसपाट करण्याची गोव्यातील ही पहिलीच घटना आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निर्देशानंतर ही कारवाई झाल्याचे समजते. संशयित सुलेमान (वय ४६ वर्षे) हा एक अट्टल गुन्हेगार आहे आणि त्याचा भूमी बळकावल्याच्या प्रकरणासमवेतच इतर गुन्ह्यांमध्येही सहभाग आहे. भूमी बळकावल्याची प्रकरणे उघडकीस आल्यापासून संशयित सुलेमान पसार आहे. सुलेमान याच्या विरोधात म्हापसा, वाळपई आणि हणजुणे येथे मालमत्ता फसवणुकीसंबंधी गुन्हे नोंद झालेले आहेत.
बनावट रबर स्टँपचा वापर करून भूमी बळकावल्या !
एकतानगरमधील उपरोल्लेखित सुमारे २० सहस्र ८१९ चौरस मीटर भूमी संशयित सुलेमान याने उपनिबंधकांचा बनावट रबर स्टँप सिद्ध करून आणि बनावट कागदपत्रे कायदेशीर असल्याचे भासवून स्वतःच्या नावावर केली होती. सप्टेंबर २०२० मध्ये म्हापसा पोलिसांनी संशयित सुलेमान याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणी तत्कालीन उपनिबंधक अर्जुन शेट्ये यांनी पोलिसांत तक्रार केली होती. भूखंड सिद्ध करून ते विक्रीस काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारची पद्धत अवलंबणारे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन ! |