Bangladesh Goddess Kali Crown Stolen : बांगलादेशात ५१ शक्‍तिपीठांपैकी एक असणार्‍या मंदिरातील देवी कालीमातेच्‍या मुकुटाची चोरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केला होता मुकुट !

देवी कालीमातेचे दर्शन घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)

ढाका (बांगलादेश) – सातखीरा जिल्‍ह्यातील जेशोरेश्‍वरी मंदिरातील देवी कालीमातेचा मुकुट चोरीला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२१ मध्‍ये या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्‍यावर हा मुकुट मंदिरात अर्पण केला होता. हा मुकुट चांदी आणि सोने यांद्वारे बनवला होता. या मंदिरातील पुजारी गुरुवारी सकाळी देवी कालीमातेची पूजा संपल्‍यानंतर बाहेर निघून गेले. त्‍यानंतर दुपारी हा मुकुट चोरीला गेला. पोलिसांनी चोरीचे अन्‍वेषण चालू केले आहे. मंदिरात सीसीटीव्‍ही कॅमेर्‍यांची पडताळणी करण्‍यात येत आहे.

१. मंदिराची देखभाल करणार्‍या कुटुंबातील सदस्‍य श्री. ज्‍योती चट्टोपाध्‍याय यांनी सांगितले की, पौराणिक कथांमध्‍ये जेशोरेश्‍वरी मंदिर भारत आणि शेजारील देशांमध्‍ये पसरलेल्‍या ५१ शक्‍तिपीठांपैकी एक म्‍हणून पूज्‍य आहे. जेथे देवी सतीच्‍या पायाचे तळवे पडले होते आणि ती देवी जशोरेश्‍वरीच्‍या रूपात येथे वास्‍तव्‍य करते.

२. जशोरेश्‍वरी मंदिर देवी कालीमातेला समर्पित आहे. असे मानले जाते की, हे मंदिर १२ व्‍या शतकात अनारी नावाच्‍या ब्राह्मणाने बांधले होते. त्‍यांनी जशोरेश्‍वरी १०० दरवाजांचे मंदिर बांधले. या मंदिराचा नंतर १३ व्‍या शतकात लक्ष्मण सेन यांनी जीर्णोद्धार केले. १६ व्‍या शतकात राजा प्रतापादित्‍याने हे प्रसिद्ध मंदिर पुन्‍हा बांधले.

संपादकीय भूमिका

भविष्‍यात बांगलादेशातील हिंदूंची मंदिरे शिल्लक रहातील का ? हाच प्रश्‍न आहे. बांगलादेशातील हिंदू आणि हिंदु धर्म यांच्‍या रक्षणासाठी निष्‍क्रीय रहाणार्‍या हिंदूंना हे लज्‍जास्‍पद आहे !