नवी देहली – काँग्रेसला सामाजिक न्यायाची काळजी असेल, तर ती मुसलमानांच्या जातींचा उल्लेख का करत नाही, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला विचारला आहे. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर हिंदूंना जातींमध्ये विभागण्याचा कट रचल्याचा आरोप केला आणि काँग्रेस सत्तेत परतण्यासाठी हिंदु समाजात विष पेरत असल्याचे म्हटले. महाराष्ट्रातील ७६ अब्ज रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभाला ‘व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग’द्वारे संबोधित करतांना मोदी यांनी काँग्रेसवर द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.
मोदी पुढे म्हणाले की,
१. काँग्रेसने हिंदूंच्या एका जातीला दुसर्या जातीशी लढवून विजय मिळवण्याचा कट रचला. काँग्रेसचे हिंदुद्वेषी डावपेच लोकांना समजले आहेत. त्यामुळे ते काँग्रेसला धडा शिकवत आहेत.
२. काँग्रेसने नेहमीच ‘फूट पाडा आणि सत्ता मिळवा’ हे सूत्र पाळले आहे. काँग्रेस अजूनही देशाचे विभाजन करण्यासाठी नवनवीन कथानके रचत आहे.
३. मुसलमानांच्या जातीचा प्रश्न आला की, काँग्रेसचे नेते तोंड बंद करून बसतात; पण जेव्हा हिंदु समाजाचा प्रश्न येतो, तेव्हा काँग्रेस जातीवरून चर्चा चालू करते.
४. हिंदूंच्या एका जातीला दुसर्या जातीशी लढवायचे हे काँग्रेसचे धोरण आहे. जितके हिंदू विभाजित होतील तितका लाभ होईल, हे काँग्रेसला ठाऊक आहे.