CM Yogi Warned : आंदोलनाच्‍या नावाखाली अराजकता निर्माण करणार्‍यांना किंमत चुकवावी लागेल !

उत्तरप्रदेशाचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांची यति नरसिंहानंद यांच्‍या प्रकरणावरून हिंसक आंदोलन करणार्‍या धर्मांध मुसलमानांना अप्रत्‍यक्ष चेतावणी

उत्तरप्रदेशाचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – प्रत्‍येक नागरिकाच्‍या मनात महापुरुषांप्रती कृतज्ञतेची भावना असली पाहिजे; पण कुणावरही ती बलपूर्वक लादली जाऊ शकत नाही. सर्व धर्मियांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. कुणीही श्रद्धेशी खेळल्‍यास, महापुरुष, देवता, पंथ आदींच्‍या श्रद्धेला धक्‍का देत असभ्‍य टिपणी केल्‍यास त्‍याला कायद्याच्‍या कक्षेत आणून कठोर शिक्षा केली जाईल. आंदोलनाच्‍या नावाखाली अराजकता, तोडफोड किंवा जाळपोळ मान्‍य नाही. असे धाडस करणार्‍याला त्‍याची किंमत चुकवावी लागेल, अशा शब्‍दांत उत्तरप्रदेशाचे मुख्‍यमंत्री योगी अदित्‍यनाथ यांनी चेतावणी दिली.

यति नरसिंहानंद यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्‍यावरून राज्‍यात मुसलमानांकडून निदर्शने करत हिंसाचार केला जात आहे. त्‍या पार्श्‍वभूमीवर मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी ही चेतावणी दिली. सणांच्‍या पार्श्‍वभूमीवर मुख्‍य सचिव, पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अपर मुख्‍य सचिव आणि इतर विभागाच्‍या वरिष्‍ठ अधिकार्‍यांसमवेत कायदा अन् सुव्‍यवस्‍थेच्‍या संदर्भात घेण्‍यात आलेल्‍या आढावा बैठकीत ते बोलत होते.

शारदीय नवरात्री आणि विजयादशमी आनंदात, शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरी व्‍हावी, यासाठी प्रत्‍येक जिल्‍हा आणि प्रत्‍येक पोलीस ठाणे यांनी दक्षता घ्‍यावी, अशी सूचना मुख्‍यमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला दिली.

संपादकीय भूमिका

योगी आदित्‍यनाथ यांच्‍या व्‍यतिरिक्‍त देशातील एकही मुख्‍यमंत्री कधी अशी थेट चेतावणी देत नाहीत, यावरून योगी आदित्‍यनाथ जनतेच्‍या सुरक्षेप्रती किती संवेदनशील आहेत, हे लक्षात घ्‍या !