नगरपालिकेतील कर्मचार्यांकडून तक्रार प्रविष्ट
यावल (जिल्हा जळगाव) – यावल नगरपरिषद कार्यालयात ३० सप्टेंबर या दिवशी नवरात्रोत्सवानिमित्त नगरपरिषद कर्मचार्यांची बैठक घेण्यात आली. त्यात मुकादम शेख मोबीन शेख रशीद या कर्मचार्याने बेशिस्त वागणूक केल्याने यावल नगरपरिषद पाणीपुरवठा आणि स्वच्छता अभियंता सत्यम पाटील यांच्यासह नगरपालिकेतील कर्मचार्यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी आणि यावल पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली अन् त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. याविषयी मोबीन याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. त्याच्या कामात त्याने कामचुकारपणा केला असल्याचेही आढळून आले.
मुकादम शेख मोबीन शेख रशीद याने बैठकीत अरेरावी केली, तसेच तो सांगत होता, ‘‘मी माझ्या सोयीने कामे करीन. मला कुणीही वरिष्ठ नाही. मी माझ्या मनाला पटेल, तसे करीन. तुम्हाला जे करायचे आहे, ते करा.’’ यावर सत्यम पाटील म्हणाले, ‘‘तुम्ही भाषा नीट वापरा. हे कार्यालयीन शिस्तीला धरून नाही. तुम्हाला वाद घालायचा आहे का ?” एवढे होऊनही, तसेच बैठकीत महिला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असतांनाही त्याने सत्यम पाटील यांना उद्देशून शिवीगाळ केली, तसेच अपशब्द उच्चारले. दगड हातात घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली. अन्य कर्मचार्याने त्याच्या हातातील दगड हिसकावून घेतले. ‘शेख मोबिन शेख रशीद याने कार्यालयीन शिस्तीचे उल्लंघन केलेले असून महाराष्ट्र नागरी सेवा नियम व शासकीय नियमान्वये कार्यवाही व्हावी. तसेच वरिष्ठांसमवेत चुकीची वागणूक आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याविषयी त्यांच्या जिवाचे कमी जास्त झाल्यास शेख मोबिन शेख रशीद उत्तरदायी राहील. त्याच्यावर गुन्हा नोंदवावा, अशी विनंती !’, असे तक्रारीत म्हटले होते.
संपादकीय भूमिका :अशा उद्दामांना बडतर्फच करायला हवे ! |