गोमातेविषयी मुख्यमंत्र्यांनी धारिष्ट्य दाखवले ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद

भाईंदर – देशात ५६ इंचाची छाती एकाच व्यक्तीची आहे आणि ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. देशात अनेक पंतप्रधान, मुख्यमंत्री होऊन गेले; मात्र कुणीही गायीला मातेचा दर्जा दिला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. ज्यासाठी ७८ वर्षे वाट पहावी लागली, ती गोष्ट करण्याचे धारिष्ट्य एकनाथ शिंदे यांनी दाखवले, अशा शब्दांत जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. येथील ‘भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलना’त ते बोलत होते.

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद पुढे म्हणाले…

१. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे आम्ही अभिमानाने सांगू शकतो की, आमच्या देशात गोमातेला राज्यमातेचा दर्जा आहे. ‘सी.एम.’ (CM) अर्थात् ‘काऊज मॅन’ (गायींचे रक्षण करणारा) या वेळी शंकराचार्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना शुभाशीर्वाद दिले.

२. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळात चर्चा करून गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. गायीचे रक्षण करतात, तेच खरे हिंदु आहेत.

३. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही. आम्ही भारतीय संस्कृती, सनातन धर्म आणि भारतीय लोक यांचे प्रतिनिधी आहोत.

४. भारताची भावना सडेतोडपणे मांडणे आणि भारताच्या हिताचे कार्य करणार्‍याचे कौतुक करणे, हा आमचा अधिकार आहे.

५. या देशात गायीविषयी बोलणे हा मोठा अपराध झाला आहे. आपण इस्लामाबाद किंवा कराची येथे तर नाही ना, असा विचार मनात येतो; मात्र कठीण काळात एकनाथ शिंदे यांनी ५६ इंचाची छाती दाखवत गायीला गोमातेचा दर्जा दिला. हा निर्णय भारताच्या परिवर्तनाचा प्रारंभ असून त्याचे प्रणेते एकनाथ शिंदे आहेत.