कुठे नेऊन ठेवली आहे ‘मराठी’ माझी ?

जगभर वाजणारा आधुनिक आणि पाश्‍चात्त्य संगीताचा एक प्रकार म्‍हणजे ‘टेक म्‍युझिक’ (एक प्रकारचे पाश्‍चात्त्य संगीत) ! हा प्रकार जगभरातील तरुणांचे आकर्षण असलेला आणि आवडीचा विषय आहे. मुख्‍यतः पबमध्‍ये अशा प्रकारचे संगीत वाजवून बेधुंद नाचण्‍याची पद्धत आहे. महाराष्‍ट्रातही अनेक पब आहेत, ज्‍यात असे संगीत वाजवले जाते; परंतु देश-विदेशांत काय; पण महाराष्‍ट्रातील कोणत्‍याही पबमध्‍ये या संगीत प्रकारात मराठी गाणे वाजवले जात नाही.

सौ. प्रीती आनंद जाखोटिया

मराठीचा अभिमान असलेल्‍या एका तरुणाला ही गोष्‍ट खटकली आणि ‘मराठी वाजलंच पाहिजे’, या विचाराने त्‍याने मराठी भाषेचा या संगीत प्रकारात समावेश केला. या मराठी तरुणाने बनवलेली मराठी ‘रिमिक्‍स’ गाणी आता जगप्रसिद्ध झाली आहेत. जगभरात या मराठी तरुणाने बनवलेल्‍या संगीताचे कार्यक्रम होत आहेत. या तरुणाने मिळवलेले यश पहाता मराष्‍ट्रातील कुणाही मराठी माणसाचा ऊर कौतुकाने भरून येईल; पण….

वाक्‍यात येणार्‍या या ‘पण’ला पुष्‍कळ महत्त्व आहे; कारण ‘माझा मराठाचि बोलु कौतुकें। परि अमृतातेंही पैजां जिंके।…’ या संतवचनाची महत्ता जाणणारी खरी मराठी व्‍यक्‍ती मराठी भाषेच्‍या ‘अशा प्रचारा’ला ‘ठीक आहे’ या २ शब्‍दांत अभिप्राय देईल. ‘टेक म्‍युझिक’मध्‍ये जरी मराठी अंतर्भूत झाली असली, तरी या माध्‍यमातून ‘मराठी’ भाषेचा प्रचार होत आहे कि ‘टेक म्‍युझिक’चा ? कारण आपल्‍या मराठी मुलाने अशी कामगिरी केल्‍याच्‍या कौतुकातून सर्वसामान्‍य मराठी कुटुंबात ओळखले न जाणारे ‘टेक म्‍युझिक’ ऐकले जाऊ लागले आहे. विदेशातील किती लोकांना ‘टेक म्‍युझिक’मधील मराठी भाषा समजली, हा संशोधनाचा विषय आहे; कारण पबमधील संगीतातील ठेक्‍यांवर थिरकणार्‍यांना ‘कोणती भाषा आहे ?’, याचे काही पडले असेल का ? त्‍यामुळेच आता नेमका कशाचा प्रसार होत आहे, हे काळानुसार कळेलच.

मराठी तरुणाने भाषेच्‍या प्रेमापोटी केलेल्‍या धडपडीचे कौतुक न करण्‍यासारखे काही नाही; पण मराठी विश्‍वभरात पसरवण्‍यासाठी या प्रकाराला प्रोत्‍साहन देण्‍याची आवश्‍यकता आहे का ? हा प्रश्‍न आहे. मुळातच मराठी संस्‍कृती, मराठी भाषेतून व्‍यक्‍त होणारा भाव, मराठीची शालीनता, तिच्‍यातील नम्रता, ढब, सालंकृतपणा हे सर्व संस्‍कृत भाषेनंतर मराठी भाषेतच दिसून येते. ‘टेक म्‍युझिक’ने मराठीची ही शालीनता टिकून रहात आहे का ? मराठी भाषेचेच वेड लोकांना लावायचे असेल, तर आपल्‍याकडे संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊली आणि जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांची भजने, कीर्तने आहेतच की. संत नामदेवांनी मराठी पंजाबपर्यंत पोचवली, तशी आताही ‘मराठी’ची महत्ता तशीच ठेवत सातासमुद्रापलीकडे नेता येईलच !

– सौ. प्रीती जाखोटिया, फोंडा, गोवा. (२८.९.२०२४)