हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – हुपरी येथील अवैध मदरशाचा वापर सुन्नत जमियतने करू नये, तो केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस नगर परिषद प्रशासनाने २५ सप्टेंबरला जमियतच्या मुख्य फलकावर लावली आहे. असे असतांना त्या मदरशात प्रवेश केल्याप्रकरणी मुसलमान समाजाचे अध्यक्ष रमजान घुडूभाई यांच्यावर हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी हुपरी नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता प्रदीप देसाई यांनी फिर्याद दिली आहे.
येथील सुन्नत जमियतने उभारलेल्या अवैध मदरशावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री नितीन काकडे, राजेंद्र पाटील, प्रशांत साळोखे आणि प्रतापराव भोसले यांनी नगर परिषद हुपरी परिषदेसमोर २३ सप्टेंबरपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला होता. अवैध मदरशाचा वापर प्रशासनाकडून प्रतिबंधित केल्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी २५ सप्टेंबरला उपोषण स्थगित केले आहे.
अवैध मदरशाची पाणीजोडणी अगोदरच तोडण्यात आली असून वीजतोडणी तात्काळ तोडण्याचे पत्र वीज वितरण आस्थापनाला प्रशासनाने दिले होते. यानंतर जमियतची वीज जोडणी तोडण्यात आली. रमजान यांनी या मदरशात प्रवेश करून जनरेटरद्वारे येथील वीजपुरवठा चालू करण्याचा प्रयत्न केला.