Varkari Sammelan Alandi – Pune : वारकरी आणि हिंदु धर्म यांच्या विरोधातील षड्यंत्र हाणून पाडू !

  • १ सहस्र वारकर्‍यांचा एकमुखी निर्धार !

  • ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात घरोघरी प्रबोधन करण्याचे संमेलनात आवाहन !

वारकरी संमेलनाच्या उद्धाटन प्रसंगी दीप प्रज्वलन करतांना मान्यवर

आळंदी (जिल्हा पुणे), २९ सप्टेंबर (वार्ता.) : आळंदी देवाची येथे पार पडलेल्या ‘वारकरी संमेलना’त वारकरी संप्रदाय, तसेच हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात चालू असलेले षड्यंत्र हाणून पाडण्याचा १ सहस्राहून अधिक वारकरी आणि कीर्तनकार यांनी निर्धार केला. या वेळी प्रत्येक वारकर्‍याने ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले. आळंदी देवाची येथे २८ सप्टेंबर या दिवशी प्रदक्षिणा मार्गावरील फ्रुटवाले धर्मशाळा येथे हे संमेलन उत्साही वातावरणात पार पडले.

या संमेलनात ‘हिंदु धर्म आणि राष्ट्रासमोरील आव्हाने अन् उपाय’ या विषयावर प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले. संमेलनाचे आयोजन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले होते. वारकरी शिक्षणसंस्थेच्या विद्यार्थ्यांना ग्रंथ आणि पुस्तके यांचे वाटप करण्यात आले.

व्यासपिठावर उपस्थित मान्यवर

उपस्थित मान्यवर…

या संमेलनाला ह.भ.प. संग्राम बापू भंडारे महाराज, गुरुवर्य ह.भ.प. ज्ञानेश्‍वर शिंदे महाराज, गुरुवर्य ह.भ.प. ज्ञानेश्‍वर कदम महाराज (छोटे माऊली), ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज, ह.भ.प. दिगंबर महाराज नरावडे, ह.भ.प. नवल महाराज, ह.भ.प. नामदेव महाराज वाळके, ह.भ.प. संजय महाराज उंदरे, ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर, ह.भ.प. संतोष आनंद महाराज, ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती, तर ह.भ.प. कीर्तनकार-प्रवचनकार महाराज, वारकरी शिक्षणसंस्थेतील गुरुवर्य आणि ज्येष्ठ साधक विद्यार्थी, हिंदुप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –

हिंदु जनजागृती समिती निष्कामपणे हिंदु धर्मावरील आघात हाणून पाडण्याचे कार्य करते ! – ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले

वारकरी संमेलनात संबोधित करतांना ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले

‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’चे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्व आणि हिंदु तत्त्वज्ञान यांकडे दुर्लक्ष करून केवळ सत्ता, संपत्ती आणि कीर्ती मिळवण्यासाठी अनेक ‘मंडळीं’नी स्वतःचे आयुष्य खर्ची घातले; मात्र हिंदु जनजागृती समिती याला अपवाद आहे. देशात पोलीस आाणि सीमेवर सैनिक देशाचे संरक्षण करत आहेत, तर दुसरीकडे हिंदु जनजागृती समिती निष्कामपणे धर्मप्रसार करून हिंदु धर्मावरील आघात हाणून पाडण्याचे कार्य करत आहे.

प्रत्येक ३ महिन्यांनी असे संमेलन व्हावे ! – ह.भ.प. संग्राम बापू भंडारे महाराज

वारकरी संमेलनात संबोधित करतांना ह.भ.प. संग्राम बापू भंडारे

ह.भ.प. संग्राम बापू भंडारे महाराज म्हणाले की, आळंदी येथे घेतलेल्या वारकरी संमेलनाला वारकर्‍यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे आता प्रत्येक ३ महिन्यांनी असे संमेलन आळंदी येथे झाले पाहिजे. परकीय आक्रमणे, जिहाद आणि धर्मांतर मोठ्या प्रमाणात होत असतांनाही वारकरी संप्रदायाने आपली संस्कृती टिकवून ठेवली. मुसलमान आपल्या वारीत जरी आले, तरी ते त्यांचा पंथ घेऊन येतात. आपले हिंदू आपली संस्कृती सोडून गोल टोप्या घालून बसतात. मुसलमानांच्या षड्यंत्रापासून हिंदूंनी सावध झाले पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खांद्याला खांदा लावून हिंदु धर्माचा प्रसार करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी केले आहे.

हिंदू आणि वारकरी वेगळे असल्याचा अपप्रचार केला जात आहे ! – समीर दरेकर, हिंदु संघटक आणि लेखक

वारकरी संमेलनात संबोधित करतांना श्री. समीर दरेकर, हिंदु संघटक आणि लेखक

हिंदूंनी इस्लाम आणि कुराण समजून घेणे आवश्यक आहे. हिंदूंनी कुराण समजून घेतल्यानंतर त्यांना समजेल की, मुसलमान सर्वधर्मसमभाव का मानत नाहीत ? ख्रिस्ती लोक आता येशूचे अंभग काढत आहेत. येशूची प्रतिमा ठेवून सत्यनारायणाची पूजा केली जात आहे. हिंदू आणि वारकरी वेगळे असल्याचा अपप्रचार धर्मद्रोही मंडळींकडून केला जात आहे. ख्रिस्त्यांकडून हिंदूंची नावे देऊन हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. परधर्मात गेलेल्या हिंदूंना स्वधर्मात आणणे, हे वारकर्‍यांचे कर्तव्य आहे. या विरोधात वारकर्‍यांनी सतर्क राहून धर्मांतराला विरोध केला पाहिजे.

‘अर्बन नक्षलवादा’चे षड्यंत्र हाणून पाडा ! – सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती

संमेलनात संबोधित करतांना श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती

भारतात २५ वर्षांत नक्षलवाद्यांनी १४ सहस्रांहून अधिक सैनिक, पोलीस आणि राजकीय नेते यांच्या हत्या केल्या आहेत. काश्मीरमध्ये ३२ वर्षांपूर्वी हिंदूंच्या हत्या झाल्या; मात्र पुरो(अधो)गामी आणि साम्यवादी मंडळी यांनी तोंड उघडले नाही. या संघटना अर्बन नक्षलवाद्यांना साहाय्य करत आहेत. हा अर्बन नक्षलवाद आता वारकर्‍यांच्या वारीतही घुसला आहे. त्यांच्याकडून ‘हिंदु धर्म वेगळा, वारकरी संप्रदाय वेगळा’, असा भेदभाव करून हिंदूंच्या मनात विष पेरले जात आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संघटित होऊन हे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे.

‘हलाल जिहाद’च्या विरोधात वारकर्‍यांनी संघटित व्हावे ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा

संमेलनात संबोधित करतांना कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा

‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून हिंदूंकडून वसूल केलेला पैसा हा कारागृहात असलेल्या आतंकवाद्यांना सोडवण्यासाठी वापरला जात आहे. त्यामुळे ‘हलाल अर्थव्यस्थे’ला विरोध करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘हलालविरोधी कृती समिती’ची स्थापना होऊ लागली आहे. यात समाजातील सर्व स्तरांतील राष्ट्रनिष्ठ व्यक्ती आणि संघटना यांना सहभागी करून घेऊन या अर्थव्यवस्थेच्या विरोधात जनआंदोलन उभे करण्यात येणार असून या आंदोलनात सर्व वारकर्‍यांनी संघटितपणे सहभागी व्हावे.

संमेलन यशस्वी होण्यासाठी योगदान दिलेल्यांचा सत्कार…

सर्वश्री अजय कुमार, दत्ताजी ढोले, विजय जाधव, अनिल मांडोळे, अमित थोरात, संजय थोरात, ‘फ्रुटवाले धर्मशाळे’चे प्रतिनिधी अध्यक्ष श्री. भगवान थोरात, व्यवस्थापक श्री. नवनाथ काशीद यांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी योगदान दिल्याविषयी संमेलनात सर्वांचा सत्कार करण्यात आला. ह.भ.प. संग्राम बापू भंडारे महाराज यांचा सन्मान हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केला.

निवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रकाश लोंढे यांच्या पुढाकाराने वारकरी संमेलन यशस्वी !

वारकरी संमेलनात संबोधित करतांना श्री. प्रकाश लोंढे, निवृत्त पोलीस उपअधीक्षक आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ

वारकरी संमेलनात हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा उद्देश निवृत्त पोलीस उपअधीक्षक श्री. प्रकाश लोंढे यांनी सांगितला. श्री. लोंढे यांनी चिकाटीने पुढाकार घेऊन आळंदी येथील वारकरी संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले आणि हे संमेलन यशस्वीपणे पारही पडले. लोंढे यांच्या तळमळीमुळे या संमेलनाला वारकरी संप्रदायातील विविध घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वारकर्‍यांचे अभिप्राय…

१. श्री. रामचंद्र बोराटे, मोशी (पुणे) – कार्यक्रम पुष्कळ चांगला झाला. पुष्कळ वारकरी पाहून कौतुक वाटले.

२. ह.भ.प. नितीन ताकवणे महाराज, पारगाव, दौंड (जिल्हा पुणे) – हे संमेलन पुष्कळ आवडले. अप्रतिम कार्यक्रम आणि सर्व विषय छान झाले. (ह.भ.प. नितीन ताकवणे महाराजांनी स्वतःसमवेत ८-१० जणांना आणले होते.)

वारकरी संमेलनाला उपस्थित वारकरी

क्षणचित्रे

१. संमेलनात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’ अशा वारकर्‍यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले.

२. संमेलनात हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात वारकर्‍यांनी लढा देण्याचे आवाहन वक्त्यांनी केल्यानंतर त्याला सर्व वारकर्‍यांनी हात उंचावून प्रतिसाद दिला.

३. वारकर्‍यांनी असे संमेलन वारंवार होण्याची अपेक्षा व्यक्त केली.