पिंपरी (पुणे) – पी.एम्.आर्.डी.ए. (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) अंतर्गत गोपनीय माहिती, महत्त्वाची कागदपत्रे भ्रमणभाषच्या माध्यमातून बाहेर पाठवली जाऊ नयेत, यासाठी दक्षता घेतली जात आहे. त्यातून कंत्राटी कामगारांना वैयक्तिक भ्रमणभाष वापरण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. त्याच्या कार्यवाहीसाठी लवकरच प्रत्येक विभागाला कळवण्यात येणार आहे, असे समजते.
पी.एम्.आर्.डी.ए. प्रशासनाकडून महिन्यापूर्वीच नव्या आस्थापनाला कंत्राटी कर्मचार्यांचा ठेका देण्यात आला आहे. त्यातील नियम आणि अटी यांमध्ये भ्रमणभाष वापरण्यावर बंदी असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्याची कार्यवाही आता केली जात आहे. भ्रमणभाषचा गैरवापर केला जाऊ शकतो. अनेक कर्मचारी भ्रमणभाष पहाण्यात वेळ घालवतात. आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रकरणाची गंभीर नोंद घेतली. प्रशासनाच्या प्रत्येक विभागाला वैयक्तिक भ्रमणभाष कामाच्या वेळेत वापरता येत नसल्याचे कळवण्यात आले आहे.