श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती आणि मार्क्सवादी विचारसरणीचे ‘एन्.पी.पी.’ (नॅशनल पीपल्स पार्टी) आघाडीचे आणि ‘जेव्हीपी’ (जनता विमुक्ती पेरामुना) या पक्षाचे नेते अनुरा कुमारा दिसानायके हे सध्या तेथील तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. श्रीलंकेची आर्थिक स्थिती डबघाईला येण्याचे मुख्य कारण म्हणजे तेथील भ्रष्टाचार आहे आणि दिसानायके यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देण्याचे आश्वासन जनतेला देत श्रीलंकेला ‘भ्रष्टाचारमुक्त’ बनवण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना ‘हे काहीतरी आर्थिक सुधारणा आणि समानता वगैरे निर्माण करतील’, असे वाटत आहे.
भारताला इंगा दाखवावाच लागेल !
दिसानायके मार्क्सवादी आहेत आणि त्यांचा भारतद्वेष जुना, म्हणजे काँग्रेस काळापासूनचा आहे. त्या वेळेपासून त्यांनी आता सत्तेवर येण्यापूर्वी आणि सत्तेवर आल्यावरही मुद्दामहून चेतावणीवजा तो व्यक्त केला. ‘कुणीही आमच्या देशाचा वापर करू शकणार नाही’, या विधानातून अप्रत्यक्षरित्या भारताला डिवचून त्यांनी परत एकदा त्यांच्या भारतद्वेषी धोरणाचा पुनरुच्चार केला. ‘कुणीही’, म्हणजे त्यांच्या दृष्टीने चीनला तर सूट आहेच आणि उरतो तो केवळ भारतच. दिसानायके हे चीनप्रेमी आहेत आणि त्यांचे चीनप्रेम काही लपून राहिलेले नाही. एकेकाळी प्रखर साम्यवादी देश म्हणून ओळखला जाणारा चीन आता तर प्रत्यक्षात एक मोठा आणि कट्टर भांडवलशाही (म्हणजेच अर्थात् ज्याची दुसरी बाजू निव्वळ ‘स्वार्थ’ असते) देश बनलेला आहे. श्रीलंकेसह भारताशेजारील देशांना त्यांची मोठी हानी झाल्याविना कदाचित् हे कळणार नाही. केवळ भारतद्वेषासाठी ते अधिक चीनप्रेमी झाले आहेत. वर्ष १९८७ मध्ये राजीव गांधी यांच्या काळात भारत आणि श्रीलंका यांच्यातील एक करारानुसार भारतीय शांतीसेनेने तत्कालीन श्रीलंका सरकारला तमिळ बंडखोरांच्या विरोधात मोठे साहाय्य केले होते. तेव्हाही दिसानायके यांनी भारतीय लष्कराला बाह्य हस्तक्षेप मानून ‘आक्रमक’ म्हणून हिणवले होते. आताच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी दिसानायके यांनी ‘श्रीलंकेतील अदानी समूहाचा ४४४ कोटी रुपयांच्या वीजप्रकल्पासहित भारताशी केलेले करार अन् काही प्रकल्प रहित करू’, अशी बतावणी केली. त्यामुळे भारताविरोधातील गरळओळ करणारे धोरण श्रीलंकेने असेच चालू ठेवले, तर भारताने मालदीवप्रमाणेच मुत्सद्देगिरीने धडा शिकवून त्याला इंगा दाखवावा लागेल.
भारत आणि चीन हेच केंद्रबिंदू
आशिया खंडात भारत आणि चीन हे केंद्रबिंदू असल्याने आशिया खंडातील सर्व छोट्या देशांचे ‘कधी इकडे, तर कधी तिकडे’, असे पारडे झुकवणे चालू असते. भारताची वाढती आर्थिक आणि संरक्षण कुमक, तसेच भक्कम सरकार पहाता भारताभोवतीच्या श्रीलंका, बांगलादेश, मालदीव, म्यानमार आदी आशिया खंडातील छोट्या देशांना भारताच्या विरोधात फारसे जाता येत नाही. भारतापुढे मान तुकवण्याखेरीज त्यांना पर्याय रहात नाही; परंतु त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात भारतविरोधी प्रवाह कार्यरत असतात आणि या भारतविरोधी कारवायांना हे देश रोखू शकत नाहीत किंवा रोखत नाहीत. म्यानमारमधून मणीपूरमध्ये २ सहस्र ५०० कुकी सैन्य घुसवले गेले आहे. मालदीव भारतविरोधी गरळओक करत असल्याने प्रत्यक्ष पंतप्रधान मोदी यांना अंदमान येथील बेटावरची सैर करून त्याला धडा शिकवावा लागला. या सर्व छोट्या देशांशी भारत आणि चीन यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालू आहे. खरेतर या व्यापारावरच हे छोटे देश अवलंबून आहेत; परंतु हे छोटे देश भारताला अधूनमधून व्यापारावर बंधने घालून कोंडीत पकडण्याची हुलकावणी देत असतात. अर्थात् भारत आता मुत्सद्देगिरीसह सर्वदृष्ट्या सक्षम असल्याने तो त्यांना बधत नाही; परंतु चीनच्या जोरावर या देशांचे हे धारिष्ट्य चालू असते.
अमेरिका-चीन यांची पाताळयंत्री धोरणे
अमेरिका आणि चीन यांसारख्या तत्सम देशांना खरेतर मोदी तिसर्यांदा परत सत्तेवर येणे नको होते. त्यामुळे भारताच्या शेजारील देशांमध्ये त्यांचे स्थान किंवा वर्चस्व निर्माण करून एक प्रकारे भारतावर नियंत्रण ठेवण्याचे काम अमेरिका आणि चीन करत असतात. ‘त्यांचे ‘उद्योग’ चालतील’, अशी सरकारे त्यांना सर्व देशांत हवी आहेत. अमेरिका पाकला पैसे आणि शस्त्र पुरवतो. ‘बांगलादेशचे सत्ताहरण हे अमेरिकेचे षड्यंत्र होते’, हे बिंग तर फुटलेच आहे. तीच गत चीनची आहे. चीनही पाकिस्तानमध्ये रस्ते बांधणी करतो, नेपाळच्या राजसत्तेवर प्रभाव टाकून नेपाळवर कब्जा करायचा प्रयत्न करतो, भूतानवर हक्क सांगतो आणि श्रीलंकेतही बेट कह्यात घेण्याच्या प्रयत्नांतून त्याचे वर्चस्व निर्माण करतो. मालदीव, बांगलादेश यांच्यानंतर कशावरून श्रीलंकेतही भारतविरोधी सरकार आणण्याचे प्रयत्न या मोठ्या राष्ट्रांनीच केले नसतील ? ‘भारत येत्या काळात महासत्ता होणार’, हे सर्वांना कळून चुकल्याने होता होईल तो ‘भारताचे पाय कसे ओढता येतील ?’, हेच या जगातील स्वार्थी भांडवलशाही देश पहात आहेत. भारताची बलस्थाने कमकुवत करण्यासाठी ते वैचारिक, सांस्कृतिक, धार्मिक, कौटुंबिक, व्यापार, शिक्षण आदी सर्वच स्तरांवर प्रयत्नरत आहेत.
चीन विकसनशील देशांमध्ये मोठी गुंतवणूक करत त्यांना कर्जबाजारी करून त्यांच्यावर कब्जा करण्यासाठी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ ही पाताळयंत्री योजना राबवत आहे. अनेक छोट्या देशांप्रमाणे श्रीलंकाही या धोरणाचा ‘पीडित देश’ आहे. ‘चीनशी जवळीक वाढली, तर तो श्रीलंकेला अधिक कर्जबाजारी करून डुबवणार आहे’, हे श्रीलंकावासियांना लक्षात आलेले नाही, असे म्हणणेही धाडसाचे आहे. ‘श्रीलंका भारताला त्याचे बेट वापरू देणार नाही’, असे दिसानायके यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ पुढे चीन ते वापरणार आहे.
साम्यवाद्यांना धडा शिकवावाच लागेल !
दिसानायके हे व्हेनेझुएला देशाप्रमाणे क्रांतीची भाषा करत आहेत. आतापर्यंत साम्यवाद्यांच्या कुठल्या क्रांतीने कुठल्या देशाचे भले झाले ? कुठला देश सुखी झाला ? झाल्या त्या सर्व सहस्रो जणांच्या हत्याच. ‘दिसानायके यांची क्रांतीची भाषा म्हणजे श्रीलंकेतील अल्पसंख्यांकांचे म्हणजे हिंदूंचे शिरकाण हे उघड आहे’, हे तेथील हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे. आतापर्यंत भारताने श्रीलंकेला आपत्काळात सैन्यापासून धान्यापर्यंत आणि तेलापासून औषधापर्यंत सर्व प्रकारचे साहाय्य केले आहे. दिसानायके हे कदाचित् लक्षात ठेवणार नाहीत; परंतु भारताने त्याची आठवण करून देऊन त्यांची आर्थिक कोंडी केल्याविना ते ताळ्यावर येणार नाहीत. श्रीलंकेला काबूत ठेवण्याच्या धोरणासह तेथील तमिळ हिंदूंच्या संरक्षणाच्या संदर्भातील धोरणही भारताला प्राधान्याने ठरवावे लागेल !
साम्यवादी होत असलेल्या श्रीलंकेला मालदीवप्रमाणेच मुत्सद्देगिरीने धडा शिकवून भारताचा इंगा दाखवावा लागणार आहे ! |